गंगा आली मारुतीरायाच्या भेटीला...

  51

मनभावन : आसावरी जोशी


श्रावण महिना सुरू झाला आहे. अनेक पौराणिक कथा या ओलेत्या पाचूच्या दिवसांना अधिकच देखण्या, सुंदर आणि पवित्र बनवितात. कालपासून घराघरांत जिवती आईचे चित्र लागले. मला लहानपणापासून या चित्राची अतिशय भुरळ पडते. याला जिवती आईचे चित्र म्हणत असले, तरी ते केवळ जिवतीपुरते मर्यादित न राहता अनेक रंगीबेरंगी गोष्टी या चित्रात दाखविल्या जातात. या केवळ सचित्र गोष्टी नसतात, तर ते आपल्याला आजीवन पुरणारे संस्कार असतात. या गोष्टी, पौराणिक कथा सतत आपले मनोबल वाढवत असतात. देवावरील, चांगुलपणावरील आपला विश्वास दृढ करत असतात. या चित्रातील भक्त प्रल्हाद देव नृसिंहाचे महात्म्य सांगत राहतो. बुध बृहस्पतीची बुद्धीचातुर्य दाखवतात. कृष्णाच्या कालियामर्दनाची तर बात न्यारीच... आणि जिवती आई, आपल्या लेकरांना दीर्घायू प्रदान करणारी... घरातील पाळणा सतत हलता ठेवणारी... जीवनदायिनी !!


या पौराणिक कथा केवळ एवढ्या पुरत्याच मर्यादित राहत नाहीत. अगदी मारुतीरायाही या सुंदर कथांचे आभूषण लेवून मोठ्या थाटात निजला आहे.. प्रयाग क्षेत्री.. आजच्या श्रावणातील पहिल्या शनिवारच्या निमित्ताने मला या घटनेची दाखल घ्यावीशी वाटली.. उत्तर प्रदेशातील देवक्षेत्र प्रयागराज. येथील त्रिवेणी संगमाप्रमाणेच भक्तांचे आत्यंतिक आकर्षण केंद्र म्हणजे पहुडलेले मारुतीराया!


या परिसरात गंगेच्या तीरावर संकटमोचन हनुमान मंदिर आहे. हनुमानाची ही विचित्र मूर्ती दक्षिणाभिमुखी आणि २० फूट लांब आहे. ती पृष्ठभागापासून किमान ६-७ फूट खाली असल्याचे मानले जाते. असे मानले जाते की, कामदा देवी त्यांच्या डाव्या पायाखाली आणि अहिरावण त्यांच्या उजव्या पायाखाली दफन केलेले आहेत. त्यांच्या उजव्या हातात राम आणि लक्ष्मण यांच्या प्रतिमा आहेत आणि डाव्या हातात गरुडाची प्रतिमा आहे. येथे येणाऱ्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.


लंकेवर विजय मिळवल्यानंतर परत येत असताना वाटेत हनुमानाला थकवा जाणवत होता. म्हणून सीतामातेच्या आज्ञेनुसार ते संगमाच्या काठावर झोपले. हे लक्षात घेऊन भगवान हनुमानाचे मंदिर बांधण्यात आले.


हे मंदिर किमान ६००-७०० वर्षे जुने असल्याचे मानले जाते. या पौराणिक कथांना खरेपणा देणारी घटना दरवर्षी याच दिवसांत या परिसरात हनुमानासोबत घडते. प्रचंड थकून झोपलेल्या हनुमंताला अभिषेक करण्यासाठी गंगामाई स्वत: देवळापर्यंत येऊन पाण्याची पातळी या निद्रिस्त हनुमंताला स्पर्श करून पुढे सरकते. हे दृश्य पाहण्यासाठी खास देशभरातून भक्त येथे येतात. साधुसंत येतात. परवाच्या मंगळवारी दुपारी २ वाजता पावसामुळे गंगेच्या पाण्याची पातळी वाढून पाण्याने मंदिरात प्रवेश केला आणि मारुतीरायाची मूर्ती पूर्णत: पाण्याच्या खाली गेली आणि भक्तांच्या डोळ्यांचे पारणे फिटले.


अशा पौराणिक कथा आपल्या देशातील प्रत्येक मंदिराशी जोडल्या गेल्या आहेत. बाबा केदारनाथ... शिवाचे हे गूढतम मंदिर थंडीच्या दिवसांत सहा महिने बंद असते, पण गर्भगृहातील दिवा अखंड तेवत असतो. आपल्या महाराष्ट्रातील पुण्याजवळचे भुलेश्वराचे मंदिर, खूप खोलवर आतमध्ये शिवलिंग आहे. त्यापुढे नैवेद्य ठेवल्यास देव स्वत: प्रसाद ग्रहण करतो.


खऱ्या खोट्याच्या किंवा पौराणिकतेच्या मुळाशी मला जायचे नाही. यातील बऱ्याच घटना भौगोलिकता दर्शविणाऱ्या आहेत यात वादच नाही. पण या गोष्टींमुळे, घटनांमुळे मनाचे सामर्थ्य वाढते. हे निर्विवाद... शेवटी जगायला माणसाला सामर्थ्य लागते. रोजच्या जगण्यातील संघर्षातून, यशापयशातून खूपदा आपण हतबल होतो. कमकुवत होतो, अशावेळी या कथा आपले मनोबल वाढवितात. दिव्यत्वापुढे हात जोडण्याचे संस्कार मिळतात आणि हे सगळे अनुभवत आपण जगण्याच्या संघर्षासाठी पुन्हा एकदा सज्ज होतो.. माझा तरी हाच अनुभव आहे... तुमचा...?

Comments
Add Comment

राजिंदर नाथ

मराठी नाटकांना हिंदीत नेणारा रंगकर्मी भालचंद्र कुबल : पाचवा वेद गेल्या आठवड्यात अखिल भारतीय नाट्यसृष्टीतील

श्रीमंत भिकाऱ्याची गोष्ट

मनभावन : आसावरी जोशी आज थोड्या वेगळ्या विषयावर बोलावेसे वाटले... बऱ्याच जणांना असे वाटेल की मी हा विषय का निवडला...?

स्वच्छतेचे महत्त्व सांगणारा ‘विराट’

टर्निंग पॉइंट : युवराज अवसरमल  ‘अवकारिका’ या मराठी चित्रपटात महत्त्वाची भूमिका बजावणारा व दक्षिणात्य

एक रंगमंच, दोन दीर्घांक आणि संयुक्त ‘प्रयोग’...

राजरंग : राज चिंचणकर मराठी रंगभूमीवर सातत्याने नवनवीन प्रयोग होत असतात. यात प्रायोगिक रंगभूमीचा वाटा मोठा आहे.

भारतीय नाट्यसृष्टीचे मूळ मोठे करणारे रतन

भालचंद्र कुबल : पाचवा वेद मध्यंतरी एक पोस्ट सोशल मीडियावर खूप व्हायरल झाली होती. त्यात रतन थिय्याम यांचा फोटो

‘रंगवेद’ आणि नाट्यकलेचा प्रयोग...

राजरंग : राज चिंचणकर एखाद्या व्यक्तीने किंवा संस्थेने ठाम निश्चय करून एखादे कार्य जिद्दीने हाती घेतले, तर ते