झालावाड शाळा दुर्घटनेत मोठा खुलासा, ५ शिक्षक आणि एका अधिकाऱ्याचे निलंबन
राजस्थान: राजस्थानातील झालावाड जिल्ह्यातील पिपलोड गावात सरकारी शाळेचे छत कोसळल्याने सात मुलांचा मृत्यू आणि १२ जण जखमी झाल्याच वृत्त आहे. विद्यार्थी सकाळच्या प्रार्थनेसाठी शाळेत जमले होते. त्यादरम्यान ही घटना घडल . गावकऱ्यांच्या मदतीने मुलांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले. या घटनेत निष्काळजीपणाच्या आरोपाखाली पाच शिक्षक आणि शिक्षण विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे.
राजस्थानातील झालावाड जिल्ह्यातील पिपलोड गावात शुक्रवारी सकाळी एक दुःखद अपघात घडला. सरकारी उच्च प्राथमिक शाळेचे छत कोसळले, त्यात सात निष्पाप मुले मृत्युमुखी पडली आणि १२ हुन अधिक जखमी झाले. शाळेची इमारत ही जीर्ण झाली होती, त्याबद्दल अनेक वेळा इशारे देखील देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. तरीही प्रशासन दुर्लक्ष करत राहिले आणि जी भीती होती तेच घडले.
७८ वर्षे जुनी इमारत
जेव्हा शाळेचे छत कोसळले, तेव्हा ढिगाऱ्याखाली अडकलेलूया मुलांना वाचवण्यासाठी ग्रामस्थांनी तिथे तात्काळ धाव घेतली. दरम्यान जखमींना जवळच्या आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. स्थानिक लोक आणि विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की शाळेच्या भिंती आणि छत आधीच जीर्ण अवस्थेत होते. काही काळापूर्वी प्लास्टरिंग करण्यात आले होते, परंतु स्थितीत सुधारणा झाली नाही. या शाळेची इमारत ७८ वर्षे जुनी आहे.
छत पडत असल्याचे सांगून देखील शिक्षकानी ऐकले नाही
या शाळेतील एका विद्यार्थिनीने वृत्तसंस्थेला बोलताना सांगितले की छतावरून जेव्हा खडे पडू लागले तेव्हा मुलांनी शिक्षकांना सांगितले होते, पण त्यांनी त्यांना फटकारले आणि बसण्यास सांगितले. त्यानंतर छत कोसळले आणि त्यात मुले गाडली गेली. अपघाताच्या वेळी शिक्षक जवळच नाश्ता करत होते. माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केले आणि सांगितले की हे खूप वेदनादायक आहे.
गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट
या घटनेनंतर गावात संतापाची लाट उसळली आहे. पीडित मुलांच्या कुटुंबातील सदस्य आणि ग्रामस्थांनी सांगितले की शाळेच्या स्थितीबद्दल अनेक वेळा तक्रारी करण्यात आल्या होत्या, परंतु कोणतीही सुनावणी झाली नाही. अपघातानंतर जिल्हा प्रशासनाने कारवाई करत पाच शिक्षक आणि शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्याला निलंबित केले. याशिवाय, जिल्हाधिकारी अजय सिंह राठोड म्हणाले की, चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे आणि अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.
मृत मुलांच्या कुटुंबियांना १० लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर
राजस्थानचे शिक्षण आणि पंचायती राज मंत्री मदन दिलावर यांनी झालावाडच्या एसआरजी रुग्णालयात दाखल असलेल्या ११ जखमी मुलांची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यासोबतच त्यांनी सांगितले की, या अपघातात ७ मुलांना आपला जीव गमवावा लागला आहे, ही अत्यंत दुःखद घटना आहे. त्यांनी सांगितले की, मृत मुलांच्या कुटुंबियांना १० लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल आणि कुटुंबातील एका सदस्याला कंत्राटी नोकरी दिली जाईल. सरकार एक नवीन शाळा बांधेल आणि शाळेच्या खोल्यांना मृत विद्यार्थ्यांचे नाव दिले जाईल. त्यांनी सांगितले की, या अपघाताची चौकशी केली जाईल आणि जबाबदार असलेल्यांवर कारवाई केली जाईल. निष्काळजीपणाबद्दल आम्ही ५ शिक्षकांना निलंबित केले आहे.