बीड : राज्यभर गाजलेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणावर मंगळवारी सुनावणी पार पडली. यामध्ये आरोपी वाल्मिक कराडचा दोषमुक्तीचा अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी ४ ऑगस्ट रोजी होणार असल्याची माहिती विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिली आहे.
उज्ज्वल निकम यांनी न्यायालयात भक्कम बाजू मांडली.
या सुनावणीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, आरोपी कराडने देशमुख खून खटल्यातून मला दोषमुक्त करावे, असा अर्ज सादर केला होता. मात्र, हा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. दुसरा आरोपी विष्णू चाटे यासह इतर सर्व आरोपींनीही आम्हाला या खटल्यातून वगळण्यात यावे, दोषमुक्त करण्यात यावे, असे अर्ज न्यायालयात सादर केले होते. या सर्व अर्जांवर आम्ही जोरदार हरकत घेतली. न्यायालयाला हे स्पष्टपणे सांगितले की, ही आरोपींची ‘मोडस ऑपरेंडी’ आहे. खटल्यात विलंब करण्याची आणि वेळेचा अपव्यय करण्याची एक पद्धत आहे.