पुणे: पुण्यातील प्रसिद्ध गुडलक कॅफे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. मुंबई-पुणे हायवेवरील त्यांच्या शाखेत अंडाभुर्जीमध्ये चक्क झुरळ आढळल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे, कारण काही दिवसांपूर्वीच फर्ग्युसन रस्त्यावरील त्यांच्या दुसऱ्या शाखेत बन मस्कामध्ये काचेचा तुकडा सापडला होता.
एफडीएच्या कारवाईनंतरही सुधारणा नाही
या आधीच्या घटनेनंतर अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) फर्ग्युसन रस्त्यावरील गुडलक कॅफेचा परवाना तात्पुरता रद्द केला होता. प्रशासनाने कॅफेला काही सुधारणा पूर्ण करण्यास सांगितले होते, त्यानंतरच त्यांना पुन्हा व्यवसाय सुरू करण्याची परवानगी मिळणार होती. मात्र, या प्रकरणाची चौकशी पूर्ण होण्याआधीच, गुडलक कॅफेच्या दुसऱ्या शाखेत ही धक्कादायक घटना समोर आली आहे.
ब्रँडच्या प्रतिमेला धक्का, ग्राहकांमध्ये संताप
एकाच ब्रँडच्या दोन वेगवेगळ्या शाखांमध्ये अशा प्रकारच्या घटना वारंवार घडल्यामुळे गुडलक कॅफेच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे. अन्न तज्ज्ञांच्या मते, ही अत्यंत गंभीर बाब असून स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्याचे हे स्पष्ट उदाहरण आहे. सोशल मीडियावरही या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत आणि अन्न सुरक्षा विभागाने मुंबई-पुणे हायवेवरील शाखेचीही त्वरित चौकशी करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. या दोन्ही घटनांवर गुडलक कॅफे व्यवस्थापनाने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.