नालासोपारा : शहराच्या धानीवबाग परिसरात आरोपी पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या करून त्याचा मृतदेह राहत्या घरातच पुरण्यात आला. धानीवबागच्या गांगडीपाडा येथील साईशारदा वेल्फेअर सोसायटीत सोमवारी दि. २१ रोजी सकाळी विजय चौहान (वय ३४) यांची हत्या करण्यात आली.
तसेच त्या मृतदेहावर नवीन टाईल्स लावल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यांची पत्नी चमन देवी (वय २८) आणि प्रियकर मोनू शर्मा (वय २०) याच्या मदतीने ही निर्घृण हत्या करून त्यांचा मृतदेह घरातच पुरण्यात आला. हा प्रकार १५ दिवसांनी उघड झाला. आरोपी पत्नी ही प्रियकरासोबत फरार झाली असून पेल्हार पोलीस त्यांचा तपास करत आहे.
अखिलेश चौहान (२४) याने रविवारी रात्री भाऊ विजयचा शोध घेऊनही काही पत्ता लागत नसल्याने पेल्हार पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आहे. शेजारी राहणाऱ्या प्रियकर मोनू सोबत आरोपी चमन देवी पळून गेल्याची माहिती विजयचा भाऊ अखिलेश याने दिली. तसेच त्या परिसरातील मोबाईलवाला सर्वेश गिरी याचाही यात सहभाग असल्याचा आरोपही त्याने केला.
जमिनीतून वास येत असल्याने मृतदेह जमिनीत असल्याचे समजले. पण मनपा डॉक्टर, कर्मचारी, तहसीलदार, फॉरेन्सिक एक्सपर्ट आल्याशिवाय जमिनीत पुरलेला मृतदेह बाहेर काढता येणार नाही असे सांगण्यात आले. त्यामुळे पोलिसांची टीम घटनास्थळी असून तपास व आरोपींचा शोध घेत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांनी सांगितले.