नाशिक: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज नाशिकमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात कृषीमंत्री माणिकराव कोकाटे जात असताना, उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होऊन त्यांच्या ताफ्यावर पत्ते उधळण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत संबंधित कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा रमी खेळतानाचा व्हिडिओ गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यावर विरोधकांकडून चांगलेच तोंडसुख घेतले जात असून, त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. आज सकाळी नाशिक रोड येथील अनुराधा चौकात आयोजित कार्यक्रमात कोकाटे जात असताना त्यांच्या ताफ्यावर पत्ते उधळण्याचा प्रयत्न करण्यात आला. या निषेधात्मक कृतीत उबाठाचे उपजिल्हाप्रमुख भैया मणियार, योगेश देशमुख आणि निलेश शिरसाठ यांनी सहभाग घेतला होता. या तिघांनी कृषी मंत्री कोकाटे यांना निवेदन देण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच वेळी त्यांनी कोकाटे यांच्या अंगावर पत्ते उधळण्याचा प्रयत्न करून वातावरण तापवले. दरम्यान पोलिसांनी तत्काळ तिथे येऊन या तिघांना ताब्यात घेतले.
सदर प्रकरण आणखीन चिघळू नये तसेच, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.