लातूरचे मारहाण प्रकरण भोवले
मुंबई : लातूरमध्ये घडलेल्या मारहाणीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांना त्यांच्या पदाचा तत्काळ राजीनामा देण्याचे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
खासदार सुनील तटकरे रविवारी लातूर दौऱ्यावर असताना माध्यमांशी संवाद साधत असताना, छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषद थांबवली आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. छावा नेते विजयकुमार घाडगे यांनी तटकरे यांच्यावर पत्ते फेकत प्रतिकात्मक निषेध केला होता. यानंतर, राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी छावा पदाधिकाऱ्यांवर हल्ला केला होता. या घटनेचे पडसाद राज्यभर उमटल्यानंतर छावा संघटनेने राष्ट्रवादीविरोधात आक्रमक पवित्रा घेतला. सुरज चव्हाण यांनी घडलेल्या प्रकारावर दिलगिरी व्यक्त केली असली तरी, राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत, चव्हाण यांना राजीनामा देण्याचे सांगितले.
दरम्यान, छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी लातूर बंदची हाक दिली. यावरून मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी छावा संघटनेला इशारा दिला. सर्वसामान्य आणि व्यापाऱ्यांना वेटीस धरले जाऊ नये. ज्यांना स्वतःहून बंद मध्ये सहभागी व्हायचं आहे ते होतील. पण, जबरदस्ती आणि दादागिरी चालणार नाही, यावर जिल्हा प्रशासन लक्ष ठेवून आहे, असा इशारा छावा संघटनेला दिला.
यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे म्हणाल्या की, “सूरज चव्हाणचा राजीनामा स्वागतार्ह आहे, पण अजित पवारांनी मोठ्या माशाला वाचवण्यासाठी लहान माशाचा बळी देऊ नये. माणिकराव कोकाटे यांचाही राजीनामा घ्यावा.”