मुंबई: वांद्रे येथील उच्चभ्रू सोसायटीत राहणाऱ्या एका ६२ वर्षीय महिलेची ७ कोटी रुपयांपेक्षा जास्त फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शेअर बाजारात जास्त परतावा मिळण्याच्या आमिषाने या महिलेला फसवणूककर्त्यांनी बळी पाडले. नेमके काय आहे प्रकरण? जाणून घेऊया
सायबर फसवणूक करणाऱ्यांनी शेअर बाजारात जास्त परतावा मिळण्याच्या आमिषाने मुंबईतील ६२ वर्षीय महिलेची तब्बल ७.८८ कोटी रुपयांची फसवणूक केली आहे.पिढीत महिला वांद्रे परिसरात राहत असून ती गृहिणी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पश्चिम विभाग सायबर पोलिस ठाण्याच्या एका अधिकाऱ्याने सोमवारी सांगितले की, गेल्या दोन महिन्यांत वांद्रे परिसरात राहणाऱ्या महिलेची फसवणूक करण्यासाठी, फसवणूक करणाऱ्यांनी स्वतःला एका प्रतिष्ठित वित्त सेवा कंपनीचे प्रतिनिधी म्हणून आपली ओळख करून दिली. पीडितेने पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, तिला पहिल्यांदा एका अज्ञात नंबरवरून व्हॉट्सअॅपवर मेसेज आला.
मेसेज पाठवणाऱ्या महिलेने स्वतःची ओळख कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याची सहाय्यक असल्याचा दावा केला. त्यानंतर शेअर गुंतवणुकीबद्दल संभाषण सुरू झाले. पीडितेला कंपनीच्या अधिकाऱ्याचा संपर्क क्रमांक आणि वेबसाइटची लिंक देण्यात आली. अधिकाऱ्याने सांगितले की, नंतर तिला एका व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये जोडण्यात आले आणि दुसऱ्या व्यक्तीशी ओळख करून देण्यात आली, ज्याने वित्तीय कंपनीशी संबंधित असल्याचा दावाही केला.
पोलिसांनी सांगितले की, महिलेच्या विनंतीवरून पीडितेने वेळोवेळी अनेक बँक खात्यांमध्ये एकूण ७८८८७००० रुपये (७ कोटी अठ्ठ्याऐंशी लाख सत्याऐंशी हजार) ट्रान्सफर केले. जेव्हा तिने तिचे पैसे काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिला अतिरिक्त १० टक्के रक्कम जमा करण्यास सांगण्यात आले. जेव्हा काहीतरी संशयास्पद वाटले तेव्हा महिलेने चौकशी करण्याचा निर्णय घेतला, ज्यामध्ये फसवणूक असल्याचे दिसून आले.
त्यानंतर महिलेने सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. सध्या पोलिसांनी संबंधित कलमांखाली अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे आणि या प्रकरणाचा सविस्तर तपास सुरू केला आहे. आरोपीला लवकरच अटक केली जाईल असा पोलिसांचा दावा आहे.