खोटी माहिती देणं अंगलट आलं
पुणे: पुण्यातील कोंढवा या उच्चभ्रू सोसायटीतील बलात्काराच्या बातमीमुळे अखंड महाराष्ट्र हादरला होता. काही दिवसांपूर्ण डिलिव्हरी बॉय असल्याचे सांगत तरुणीवर अत्याचार केल्याची घटना घडली होती, ही घटनाच मुळात पूर्णपणे बनावट असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. त्यामुळे बलात्काराचा बनाव रचणाऱ्या तरुणीवर, खोटी माहिती दिल्याप्रकरणी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२ जुलैला घरामध्ये घुसून एका डिलवरी बॉयने बलात्कार केल्याची तक्रार या तरुणीने कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये दिली होती. त्यानंतर पोलिसांनी सर्वत्र तपास केला. पोलिसांनी ५०० सीसीटीव्ही अनेक पोलीस कर्मचारी लावून तपास सुरू केला होता त्यानंतर हा डिलिव्हरी बॉय नसून परस्पर सहमतीने दोघांनी स्वतःचे फोटो काढले आणि ते एकमेकांचे मित्र असल्याचे तपासात समोर आले. या तरूणीने पोलिसांकडे अशी खोटी तक्रार का केली? याबाबतची माहिती तिने अद्याप दिली नसल्याने तिच्यावर आता न्यायालयाच्या निर्णयानंतर तपास होणार आहे.
खोटी माहिती दिल्याप्रकरणी या तरुणीविरुद्ध गुन्हा दाखल
खोटी माहिती दिल्याप्रकरणी आता तरुणीच्या अडचणीत वाढ झाली असून, तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर तपास सुरू करण्यात येणार आहे. तरुणीने कुठल्या उद्देशाने ही खोटी माहिती दिली त्यामागचा तिचा हेतू काय होता याचा तपास पोलीस करणार आहेत. पुढील काळात कुणीही खोटी तक्रार देऊन पोलिसांचा आणि प्रशासनाचा वेळ वाया जाईल त्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
पुण्यातील कोंढवा परिसरात कुरिअरबॉय म्हणून घरी आलेल्या तरुणाने तोंडावर केमिकल स्प्रे मारून बेशुद्ध केलं. त्यानंतर बेशुद्धावस्थेत लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तरुणीने केला होता. या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली; मात्र, पुणे पोलिसांनी केलेल्या तपासात हा सर्व बनाव तरुणीनेच रचला असल्याचे समोर आले. घरी आलेली व्यक्ती कुरिअरबॉय नसून, त्या तरुणीचाच मित्र होता. हे पोलिस तपासात समोर आले. त्यानंतर आता पुणे पोलिसांनी खोटी माहिती देणे, बनावट पुरावे तयार करून पोलिसांची दिशाभूल केल्याप्रकरणी 'त्या' तरुणीवर अदलखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस तपासणीत सत्य आले समोर
सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडल्याचे तरुणीने सांगितले होते. त्यानुसार पोलिसांनी तिच्या मोबाईलमधील मेसेजेस, व्हॉटस्अॅपची तपासणी केली असता. तरुणीने स्वतःच व्हॉट्सअॅपद्वारे आरोप केलेल्या तरूणाला घरी बोलावल्याचे समोर आले होते. १ जुलै रोजी केलेल्या व्हॉटसअॅप चॅटप्रमाणे फिर्यादीने आरोपीला घरी कोणी नसताना जादा कपडे घेऊन येण्याबाबत सांगितले होते. तसेच येण्याच्या मार्गाबाबत 'पूर्वीप्रमाणेच ये' असेही सांगितलेले होते. त्यावरून आरोपी हा कुरिअर बॉय नसून तो फिर्यादीचा मित्र असल्याचे समोर आले.
आरोपी आणि तरुणी एकमेकांचे मित्र
आरोप केलेला तरूण आणि तक्रार देणारी संबंधित तरूणी दोघे एकमेकांचे गेल्या वर्षापासून मित्र असल्याचे तपासादरम्यान समोर आले आहे. ससून रुग्णालयातील डॉक्टरांनाही तिने आपल्या तोंडावर स्प्रे मारल्याचे खोटे सांगितले. फिर्यादीने घटना घडल्यानंतर रात्री ८ वाजून ३५ मिनिटांनी शुद्धीवर आल्यावर स्वतःचा फोन हातात घेऊन पाहिला असं तिने तक्रारीत नमूद केलं होतं. प्रत्यक्षात अर्धनग्न फोटो आरोपीने फिर्यादीच्या मोबाईलवरून तिच्या संमतीने २ जुलैला रात्री ७ वाजून ५३ मिनिटांनी काढलेले होते. आरोपी हा सोसायटीच्या लिफ्टमधून ग्राऊंड फ्लोअरला येऊन मेनगेटमधून ८ वाजून २७ मिनिटांनी बाहेर पडल्याचे स्पष्ट झाले. तसेच, फिर्यादीच्या फोनवरून काढण्यात आलेला फोटो हा ८ वाजून २७ मिनिटे आणि ५३ सेकंदांनी एडिट करून त्यावर मेसेज टाईप केला असल्याचं निदर्शनास आलं होतं.