नवी दिल्ली : भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज, सोमवारी तात्काळ प्रभावाने आपल्या पदाचा राजीनामा दिला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी आरोग्याच्या कारणास्तव आणि वैद्यकीय सल्ल्याचा हवाला देत संविधानाच्या कलम 67 (अ) अंतर्गत राजीनामा देण्याची घोषणा केली.
राष्ट्रपती मुर्मू यांना दिलेल्या पत्रात जगदीप धनखड म्हणाले की, 'आरोग्याला प्राधान्य देऊन आणि वैद्यकीय सल्ल्याचे पालन करून, मी तात्काळ प्रभावाने भारताच्या उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा देत आहे.' त्यांनी राष्ट्रपतींचे सहकार्य आणि सौहार्दपूर्ण संबंधांबद्दल आभार मानले. पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाचे त्यांच्या सहकार्य आणि मार्गदर्शनाबद्दल आभार मानले. राजीनामा
पत्रात धनखड म्हणाले की, 'संसदेतील सर्व सन्माननीय सदस्यांकडून मला मिळालेला स्नेह, विश्वास आणि आदर आयुष्यभर माझ्या हृदयात राहील. या महान लोकशाहीत उपराष्ट्रपती म्हणून मला मिळालेल्या अनुभवाबद्दल आणि दृष्टिकोनाबद्दल मी मनापासून आभारी आहे. भारताच्या आर्थिक विकासाचा आणि अभूतपूर्व परिवर्तनाच्या टप्प्याचा साक्षीदार होणे माझ्यासाठी सौभाग्याची आणि समाधानाची गोष्ट असल्याचे सांगितले. तसेच राजीनामा पत्रात त्यांनी भारताच्या जागतिक उदय आणि उज्ज्वल भविष्यावर अढळ विश्वास व्यक्त केला.
जगदीप धनखड यांनी 2022 मध्ये भारताचे चौदावे उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. उपराष्ट्रपती पदाच्या 6 ऑगस्ट 2022 रोजी झालेल्या निवडणुकीत त्यांनी विरोधी उमेदवार मार्गारेट अल्वा यांचा पराभव केला. जगदीप धनखड यांना एकूण 725 पैकी 528 मते मिळाली, तर मार्गारेट अल्वा यांना 182 मते पडली होती. उपराष्ट्रपती होण्यापूर्वी ते पश्चिम बंगालचे राज्यपाल होते. जगदीप धनखड यांचा जन्म 18 मे 1951 रोजी राजस्थानातील झुंझुनू जिल्ह्यातील एका साध्या शेतकरी कुटुंबात झाला. त्यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण गावातील शाळेतूनच पूर्ण केले. त्यानंतर, शिष्यवृत्ती मिळाल्यानंतर ते चित्तोडगड सैनिक शाळेत शिकण्यासाठी गेले. धनखड यांची राष्ट्रीय संरक्षण अकादमीमध्ये निवड झाली होती परंतु ते गेले नाहीत. त्यांनी जयपूरच्या महाराजा कॉलेजमधून बीएससी (ऑनर्स) पदवी प्राप्त केली. राजस्थान विद्यापीठातून कायद्याचा अभ्यास पूर्ण केला. त्यानंतर त्यांनी जयपूरमध्ये राहून वकिली सुरू केली आणि राजस्थान उच्च न्यायालयाचे एक प्रसिद्ध वकील होते. जगदीप धनखर चौधरी देवीलाल यांच्या राजकारणाने प्रभावित होते. देवीलाल यांनीच त्यांना राजकारणात आणले होते.
देवीलाल यांचा पंच्याहत्तराव्या वाढदिवशी जगदीप धनखर राजस्थानहून 75 वाहनांच्या ताफ्यासह दिल्लीला पोहोचले आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वर्षाच्या अखेरीस लोकसभा निवडणुका झाल्या. राजीव गांधींचे जवळचे मानले जाणारे व्हीपी सिंह यांनी त्यांच्या विरोधात निषेधाचा नारा दिला होता. व्हीपी सिंह यांच्या जनता दलाने जगदीप धनखर यांना त्यांच्या गावी झुंझुनू येथून तिकीट दिले. व्हीपी सिंह यांचे सरकार स्थापन झाले. देवीलाल उपपंतप्रधान झाले आणि जगदीप धनखड यांना केंद्रात मंत्रीपद मिळाले होते.