पंढरपूर : शनिवारी सकाळी चंद्रभागेच्या नदी पात्रात जालना जिल्ह्यातील तीन महिला बुडाल्या . २ महिलांचा मृतदेह सापडला असून तिसऱ्या महिलेचा अजून तपास सुरु आहे .
पंढरपूर येथे श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी अनेक भाविक येत असतात . दर्शनासाठी जाण्यापूर्वी भाविक पहिले चंद्रभागा नदीत पवित्र स्नान करतात . आज सकाळी विठ्ठल दर्शनासाठी आलेल्या काही महिला भाविक स्नानासाठी नदीकाठी पोहोचल्या . यातील ३ महिला चंद्रभागा नदीत स्नानासाठी उतरल्या होत्या. त्या पुंडलिक मंदिराजवळ स्नानासाठी गेल्या. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे या तिन्ही महिला बुडाल्या. संगीताबाई संजू सपकाळ, वय ४२ आणि सुनीताबाई महादू सपकाळ, वय ३८ अशी त्यांची नावे आहेत. तिसऱ्या महिलेचे नाव अद्याप निश्चित झालेले नाही.
नदीपात्रात स्नानास उतरलेल्या आपल्या सोबतच्या महिला भावीक बुडू लागल्यावर इतर महिलांनी आरडा ओरड करून मदतीसाठी पुकारणा केली. मात्र पाण्याचा प्रवाह वेगात असल्याने तिन्ही ही महिला बुडल्या. चंद्रभागेवरील कोळी बांधवांनी बुडालेल्या दोन महिलांचा मृतदेह बाहेर काढला असून तिसऱ्या महिलेच्या मृतदेहाचा शोध अजूनही सुरू आहे. धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे सध्या चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहत आहे. भाविकांना पाण्याचा अंदाज न आल्याने ही घटना घडली आहे. या घटनेची नोंद पंढरपूर पोलीस ठाण्यात झाली आहे .
नदीकाठी आपत्कालीन व्यवस्था तैनात नसल्याने त्वरित मदत मिळाली नाही आणि या तीन भाविक महिलांना आपला जीव गमवावा लागला असं घटनास्थळी दाखल असलेलं इतर भाविक सांगत आहेत . दरम्यान या घटनेमुळे स्थानिक प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे .
या घटनेनंतर चंद्रभागेच्या काठावर कायमस्वरूपी आपत्ती व्यवस्थापनाची एक रेस्क्यू टीम तैनात करण्यात यावी अशी मागणी भाविक आणि इतर स्थानिकांकडून करण्यात येत आहे .