महाड : किल्ले रायगडचा पायरी मार्गाचा वापर १५ ऑगस्टपर्यंत पूर्ण बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष किशन जावळे यांनी काढले होते. मात्र आता या आदेशात शिथिलता दिली गेली आहे. त्यामुळे किल्ले रायगडचा पायरी मार्ग सुरू झाला असून केवळ अतिवृष्टी व रेड किंवा ऑरेंज ॲलर्टच्या काळात हा पायरी मार्ग बंद ठेवण्यात येणार आहे.
आगामी पावसाळ्यामध्ये दगडी वारंवार पडण्याच्या घटना होण्याची शक्यता नाकारता येत नसून दगडी पडून कोणत्याही प्रकारची जीवित हानी होऊ नये, याकरिता पायरी मार्ग बंद करण्यात आला होता. किल्ले रायगडवर येणाऱ्या पर्यटक आणि शिवभक्तांच्या जीवावर या परिसरातील छोटे मोठे व्यवसाय अवलंबून असून पावसाळ्यातील दोन तीन महिने जर पायरी मार्ग बंद असेल, तर पर्यटकांची संख्या कमी होत असल्याने येथील व्यवसायिकांच्या धंद्यावर परिणाम होऊन त्यांची उपासमार होत असते. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात केवळ अतिवृष्टी अथवा रेड व यलो अलर्ट असेल तरच पायरी मार्ग बंद ठेवावा अशी मागणी येथील व्यवसायिकांकडून प्रशासनाकडे करण्यात येत होती. यावर्षी जिल्हाधिकारी यांनी १५ ऑगस्टपर्यंत पायरी मार्ग बंद करण्याचे आदेश काढल्यानंतर या व्यावसायिकांकडून नाराजी व्यक्त केली गेली व पायरी मार्ग खुला करण्यात यावा अशी मागणी केली गेली. त्याची दखल घेत जिल्हाधिकारी रायगड यांनी पूर्वीच्या आदेशात शिथिलता आणत केवळ अतिवृष्टी आणि रेड किंवा यलो अलर्ट असेल त्यावेळेस पायरी मार्ग बंद ठेवण्यात असे सुधारीत आदेश काढले आहेत. रेड आणि ऑरेंज अलर्ट त्याचप्रमाणे अतिवृष्टी होत असतानाच्या काळात नाणे दरवाजा, चित्त दरवाजा आणि किल्ले रायगडवर पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्याचे आदेशही स्थानिक पोलिसांना देण्यात आले आहेत.