मुंबई : पैशांसाठी किडणी (मूत्रपिंड) विकण्यास इच्छुक असलेल्या व्यक्तीला अज्ञाताने लुबाडले. यामुळे किडणी विकण्यास इच्छुक असलेल्या व्यक्तीचे सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले.
अंधेरीत खासगी कंपनीत नोकरीवर असलेल्या व्यक्तीला वाढत्या कर्जभारातून बाहेर पडण्यासाठी अल्पावधीत मोठ्या रकमेची आवश्यकता होती. हा पैसा उभारण्यासाठी नोकरीतला पगार अपुरा असल्यामुळे संबंधित व्यक्तीने किडणी विकण्याची तयारी केली होती. तो इंटरनेटच्या मदतीने मागील काही दिवसांपासून खरेदीदार शोधत होता. हा शोध सुरू असतानाच त्याला एक नंबर सापडला. या नंबरवर फोन करुन त्याने किडणी विकायची आहे पण मोठी रक्कम हवी आहे असे सांगितले. समोरुन बोलणाऱ्या व्यक्तीने रक्तगट विचारला, इतर वैद्यकीय माहिती विचारली. पटकन पैसे हवे असल्यामुळे किडणी विकू इच्छिणारा खूष झाला. त्याने अज्ञात व्यक्तीला मागितलेली सर्व माहिती दिली. समोरुन बोलणाऱ्याने किडणीच्या बदल्यात एक कोटी रुपये मिळतील, अशी हमी दिली. हे ऐकून किडणी विकू इच्छिणारा खूष झाला.
काही दिवसांनी समोरुन फोन आला आणि किडणी विकू इच्छिणाऱ्या एक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सुमारे तीन लाख रुपये ऑनलाईन भरण्यास सांगितले. किडणीचे पैसे देताना प्रक्रियेसाठी घेतलेल्या पैशांची भरपाई करम्याची हमी देण्यात आली. हे आश्वासन मिळताच कर्ज काढून किडणी विकू इच्छिणाऱ्याने तीन लाख रुपये जमा केले. यानंतर एक - दोन दिवसांत फोन करतो असे सांगून अज्ञात व्यक्तीने कायमचा फोन बंद केला. आपण फसवले गेलो आहोत याची जाणीव होताच किडणी विकू इच्छिणाऱ्याने पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी सर्व माहिती घेऊन सायबर गुन्ह्याची नोंद केली आहे. पोलीस तपास सुरू आहे.