मुंबई : विधान भवनाच्या प्रवेशद्वारावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यात १६ जुलै रोजी झालेल्या शाब्दिक चकमकीचे तीव्र पडसाद दुसऱ्या दिवशी, १७ जुलै रोजी उमटले. आव्हाड यांचा कार्यकर्ता नितीन देशमुख आणि पडळकर यांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले यांच्यात आधी शिवीगाळ झाली आणि त्यानंतर दोन्हीकडील कार्यकर्त्यांमध्ये प्रवेशद्वाराजवळील लॉबीत तुंबळ हाणामारी झाली. या गंभीर घटनेनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात आपले निवेदन सादर केले, ज्यात त्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असल्याचे स्पष्ट केले.
परिसरात येण्यासाठी कोणतीही परवानगी घेतली नव्हती
विधानसभा अध्यक्षांना मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालानुसार, हाणामारी करणारे दोघेही अभ्यागत होते आणि त्यांनी परिसरात येण्यासाठी कोणतीही परवानगी घेतली नव्हती. त्यांच्यावर मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाची कारवाई सुरू आहे. हे कृत्य आक्षेपार्ह असून, विधान भवनात असे यापूर्वी कधीही घडले नसल्याचे अध्यक्षांनी नमूद केले. मुळात, त्या अभ्यागतांना विधान भवनात आणण्याची काहीही गरज नव्हती आणि असे अभ्यागत आल्यास त्यांची जबाबदारी संबंधित आमदारांची असते, असे त्यांनी स्पष्ट केले.
या अप्रिय घटनेनंतर विधानसभा अध्यक्षांनी सर्व आमदारांना आवाहन केले की, विधिमंडळाची परंपरा जपण्याची जबाबदारी आमदारांची आहे. आमदारांचे वर्तन हे विधिमंडळाची प्रतिमा उंचावणारे असावे आणि अशा पवित्र ठिकाणी सर्वांनी काही नियम पाळणे गरजेचे आहे.
मुंबई : काल (गुरुवारी) विधानभवन परिसरात सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या आमदारांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीच्या घटनेवर महाराष्ट्र ...
यावर गंभीर उपाययोजना म्हणून, लोकसभेच्या धर्तीवर नितीमूल्य समिती (Ethics Committee) स्थापन केली जाईल, असा निर्णय अध्यक्षांनी जाहीर केला. याबाबतचा निर्णय एका आठवड्यात घेतला जाईल असे त्यांनी सांगितले. लोकसभेत यापूर्वी खासदारांचे निलंबनच नव्हे तर त्यांचे सदस्यत्व देखील रद्द केले आहे, त्यामुळे सर्व आमदारांनी या समितीचे गांभीर्य घ्यावे, असा इशारा त्यांनी दिला. गेल्या काही दिवसांपासून आमदारांचे वर्तन हे चिंतेची बाब असल्याचे त्यांनी म्हटले. आमदारकीची शपथ घेताना आपण संविधानाबाबत जे बोलतो, त्याचे गांभीर्याने पालन करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
यापुढे फक्त आमदार आणि त्यांचे अधिकृत स्वीय सहाय्यक यांनाच विधिमंडळात प्रवेश देणार
यापुढे फक्त आमदार आणि त्यांचे अधिकृत स्वीय सहाय्यक यांनाच विधिमंडळात प्रवेश दिला जाईल, असे अध्यक्षांनी स्पष्ट केले. बहुतेक वेळा मंत्री विधिमंडळात बैठक घेतात, पण आता मंत्र्यांनाही त्यांच्या बैठका मंत्रालयात घेण्याच्या सूचना देत असल्याचे त्यांनी सांगितले. अपवादात्मक परिस्थितीत बैठक घेतली तरी अभ्यागतांना प्रवेश दिला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
प्रकरण विधानसभा विशेषाधिकार समितीकडे वर्ग
या दोन्ही अभ्यागतांनी केलेले वर्तन हे विधिमंडळाची प्रतिमा मलिन करणारे आहे, असे सांगत विधानसभा अध्यक्षांनी या दोघांचे प्रकरण विधानसभा विशेषाधिकार समितीकडे वर्ग करत असल्याचे जाहीर केले. त्यांच्या विरोधात फौजदारी कारवाई सुरू आहेच. याव्यतिरिक्त, पडळकर आणि आव्हाड यांनीच या दोन्ही अभ्यागतांना विधिमंडळात आणले असल्यामुळे, या दोन्ही आमदारांनी सभागृहात घडलेल्या प्रकाराबद्दल खेद व्यक्त करावा, तसेच भविष्यात अशी घटना घडणार नाही, असे आश्वस्त करावे, असे निर्देश अध्यक्षांनी दिले.