मुंबई: विधान भवनाच्या अंतिम आठवडा प्रस्तावादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. राज्यामध्ये ११,००० पदांसाठी पोलीस भरती होणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले आहे.
आज विधान भवनात पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस संपन्न झाला. यादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंतिम आठवडा प्रस्तावादरम्यान पोलीस भरतीविषयी मोठी घोषणा केली. मागील ३ वर्षात ३८ हजार ८०२ जागांसाठी पोलीस भरती झाल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान भवनात सांगितले. त्यानंतर महाराष्ट्रात ११ हजार जागांसाठी पोलीस भरती केली जाणार असल्याचे ते पुढे म्हणाले.
कधी होणार भरती?
पोलीस भरतीच्या मान्यतेकरीता गृह विभागाला प्रस्ताव देण्यात आला होता. या प्रस्तावाला मान्यता मिळाली असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे. ऑक्टोबर २०२५ मध्ये भरतीला सुरुवात होईल असा अंदाज वर्तवला जात आहे.
पोलीस भरती प्रक्रियेत सुरुवातीला मैदानी चाचणी आणि त्यानंतर मुंबई वगळता इतर सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी लेखी परीक्षा घेतली जाईल. या भरतीमध्ये बँड समन, चालक शिपाई, पोलिस शिपाई तसेच राज्य राखीव पोलिस बलातील अंमलदार पदांचा समावेश असल्याचे म्हटले जात आहे. उमेदवारांना एका पदासाठी फक्त एकाच जिल्ह्यात अर्ज करता येणार आहे. थोडक्यात तुम्ही ज्या जिल्ह्याचे रहिवासी आहात, त्याच जिल्ह्यातून अर्ज भरता येईल.