मुंबई : महाराष्ट्राचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात गुरुवारी राडा झाला. भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आणि शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाली. या प्रकरणी पोलिसांनी आव्हाडांचे समर्थक नितीन देशमुख यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या नितीनच्या सुटकेसाठी आव्हाडांनी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. पोलसांची गाड अडवली. जोपर्यंत देशमुख यांना सोडणार नाही, तोपर्यंत गाडीसमोरून हटणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. अखेर पोलिसांनी जितेंद्र आव्हाड यांना एका बाजूस केले आणि पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली. आता पोलिसांनी आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
मुंबईतील मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी विधानभवनात घडलेल्या घटनेबाबत सविस्तर अहवाल मागवला आहे. अहवालाआधारे पुढील कारवाईबाबत विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधान परिषदेचे सभापती राम शिंदे निर्देश देण्याची शक्यता आहे.
मागील काही दिवसांपासून भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आणि शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यात विधानभवनात वारंवार खडाखडी सुरू होती. दोन दिवसांपूर्वी आमदार पडळकर माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी आमदार आव्हाड यांनी त्यांच्यावर शेरेबाजी केली. त्यामुळे वातावरण अधिकच तापले. गुरुवारी दोन्ही आमदारांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. या घटनेनंतर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी या प्रकरणात अहवाल मागवला आहे.
रोहित पवारांची पोलिसांनाच दमबाजी
पडळकर आणि आव्हाडांच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाली. या प्रकरणात आव्हाड समर्थकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. या समर्थकांच्या सुटकेसाठी आव्हाडांनी पोलिसांचे वाहन अडवून त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. पण पोलीस या दबावापुढे झुकत नसल्याचे बघून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणात हस्तक्षेप केला. त्यांनी पोलिसांनाच दमबाजी सुरू केली. आवाज खाली करा, असं म्हणत रोहित पवार यांनी पोलिसांना सुनावल्याचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.