पुणे: बारामती शहरात गुरुवारी संध्याकाळी एका आत्महत्येच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. ती घटना म्हणजे, भिगवण परिसरात गुरूवारी मध्यरात्री बँक ऑफ बडोदामध्ये मुख्य प्रबंधक म्हणून पदभार संभाळणारे शिवशंकर मित्रा यांनी बँकेतच गळफास लावून आपले आयुष्य संपवले आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनि सुसाईड नोट देखील लिहिली होती. ज्यात त्यांनी कामाच्या अतिरिक्त दबावाला कंटाळून हा निर्णय घेत असल्याचे म्हंटले होते.
बँक मॅनेजर हे पद अतिमहत्वाचे आणि प्रतिष्ठेचे मानले जाते. चांगली नोकरी, चांगला पगार आणि सन्माननीय वागणूक मिळत असतानाही शिवशंकर मित्रा यांनी आत्महत्येचा निर्णय घेतल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. कामाचा भार असह्य झाल्यामुळे मानसिक नैराश्य येऊन आतापर्यंत अनेकांनी आत्महत्येचा निर्णय घेतलेला आहे, पण मॅनेजर पदावरील व्यक्तीने अशाप्रकारे जीवन संपवण्याची ही पहिलीच घटना आहे.
चिट्ठीत लिहिलं आत्महत्येचे कारण
गेल्या काही महिन्यांपासून शिवशंकर मित्रा यांच्यावर कामाचा दबाव वाढला होता. कामाचा तणाव त्यांना असह्य झाल्याने तसेच बँकेच्या अतिरिक्त दबावाला कंटाळून आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी चिट्ठीत लिहिलं आहे. तसेच, यासाठी कुणालाही जबाबदार धरू नये, असंही त्यांनी म्हटलं आहे.
स्वेच्छानिवृत्तीची मागणी केली होती
या चिठ्ठीत त्यांनी आपल्या पत्नीची माफी मागितली आहे. मित्रा यांनी स्वेच्छानिवृत्तीची मागणी केली होती. बँकेच्या कामाचा ताण त्यांना असह्य झाला होता. शेवटी याच त्रासाला कंटाळून त्यांनी टोकाचं पाऊल उचललं. मृत्यूनंतर आपले डोळे दान करावेत असेही त्यांनी चिठ्ठीमध्ये नमूद केले होते. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.