मुंबई :“सध्या राज आणि मी मराठी भाषेच्या मुद्द्यावर एकत्र आलो आहोत. त्यामुळे आत्ताच आम्ही एकच आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जसजशा जवळ येतील, तसतशी युतीबाबतची चर्चा सुरू होईल, असे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. ते मुंबईत शुक्रवारी पत्रकार परिषद बोलत होते
हिंदी सक्तीच्या विरोधात आयोजित केलेल्या विजयी मेळाव्याला पंधरा दिवस उलटले असले तरी ठाकरे बंधूंची औपचारिक राजकीय युती अद्याप जाहीर झालेली नाही. मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलेली मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना यांच्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी युती होणार का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
इगतपुरी येथे मनसेच्या मेळाव्यात युतीबाबत राज ठाकरे काही बोलणार का, याची उत्सुकता होती. मात्र, त्यांनी याविषयी कोणतेही भाष्य केले नाही. दरम्यान, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीबाबत सूचक वक्तव्य केले आहे.यामुळे ठाकरे बंधू एकत्र येण्याची शक्यता आणखी बळावली आहे.
उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत हिंदी सक्तीविषयी स्पष्ट भूमिका मांडली. “मुख्यमंत्री असताना मी हिंदी सक्तीची अंमलबजावणी केली नव्हती. माशेलकर अहवाल सादर झाला, पण तो स्वीकारलेला नाही. कोणत्याही भाषेची सक्ती राज्यात लागू होऊ देणार नाही,” असे ठामपणे सांगत त्यांनी केंद्र सरकारवर अप्रत्यक्ष टोला लगावला.