नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणी पुरवठा करणारी १७०० मि.मी. व्यासाची पामबीच मार्गालगत असलेल्या मोरबे मुख्य जलवाहिनीवर नेरुळ सेक्टर-४६, अक्षर बिल्डींगजवळ वारंवार गळती होत आहे. त्यामुळे या ठिकाणी नवीन जलवाहिनी टाकण्यात आलेली असून, नवीन जलवाहिनी जुन्या जलवाहिनीला दोन्ही बाजूस जोडणीचे काम शुक्रवार १८ जुलै रोजी हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी शुक्रवार १८ जुलै सकाळी १० वाजल्यापासून शनिवार १९ जुलै रोजी पहाटे ४ वाजेपर्यंत १८ तासांकरीता मुख्य जलवाहिनीवरील पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील बेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे, सानपाडा, कोपरखैरणे, घणसोली व ऐरोली या विभागामध्ये तसेच नमुंमपा क्षेत्रातील मुख्य जलवाहिनीवरील थेट नळ जोडण्यांचा व सिडको क्षेत्रातील खारघर व कामोठे नोड मधील पाणी पुरवठा बंद राहील. शुक्रवार १८ जुलै रोजी संध्याकाळचा व शनिवार १९ जुलै रोजी सकाळचा पाणी पुरवठा होणार नाही, तसेच शनिवार १९ जुलै रोजी संध्याकाळी कमी दाबाने व अपुरा पाणी पुरवठा होईल याची नागरिकांनी नोंद घ्यावयाची आहे.
तरी, या कालावधीत पाण्याचा जपून वापर करुन नवी मुंबई महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना करण्यात येत आहे.