मुंबई : राज्याच्या राजकारणात आज पुन्हा एकदा भूकंप घडला! विधानभवनाच्या अँटीचेंबरमध्ये, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांची तब्बल २० मिनिटे बंद दरवाजामागे चर्चा झाली. या चर्चेने राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. शिवसेना फोडल्याच्या जखमा अजून ताज्या असताना, ठाकरे-फडणवीस एकाच खोलीत हे दृश्य पाहून अनेकांची भुवया उंचावल्या!
नेमकी कशावर चर्चा?
विधानसभा विरोधी पक्षनेते पद, त्रिभाषा सूत्र आणि हिंदीसक्ती संदर्भात उद्धव ठाकरे व देवेंद्र फडणवीस यांच्या चर्चा झाल्याची माहिती आहे. हिंदीची सक्ती हवीच कशाला? हे पुस्तक उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना दिले. तसेच, हेच पुस्तक नव्याने नेमण्यात आलेल्या समिती अध्यक्ष नरेंद्र जाधव यांना आपण द्यावे, असं देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना म्हटलं. तर, विधानसभा विरोधी पक्षनेतेपद हे विधानसभा अध्यक्षांचा अधिकार आहे. मात्र, हे विरोधी पक्षनेतेपद अजूनही दिलं जात नाहीये, त्या संदर्भाने उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री यांच्यासोबत अँटी चेंबरमध्ये चर्चा केल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेचे काही आमदार देखील उपस्थित होते. या चर्चेनंतर फडणवीसांनी प्रसारमाध्यमांना हसत उत्तर दिलं, “काही विशेष नव्हतं…” पण राजकीय वळण सांगतंय की, हा २० मिनिटांचा काळ २०२९ च्या समीकरणांचं बीज रोपण असू शकतो!
दरम्यान, फडणवीसांच्या या ऑफरनंतर आज उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची बैठक पार पडल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला चांगलंच उधाण आल्याचं पाहायला मिळालं.