इस्लामाबाद : पाकिस्तनचे चीनसोबतचे चांगले संबंध असताना आता पाक अमेरिकेला जवळ करण्याचा प्रयत्न करतोय.यासाठी त्यांनी एक नवीन अफवा पसरवली आहे. पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट्समध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प येत्या 18 सप्टेंबर रोजी पाकिस्तानचा दौरा करणार असल्याचा बातम्या प्रसारित होत आहेत.
पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट्सनुसार, डोनाल्ड ट्रम्प येत्या 18 सप्टेंबर रोजी पाकिस्तानचा दौरा करू शकतात. परंतु यात किती तथ्य आहे, यावरही प्रश्न उपस्थित केले जाताहेत. कारण, डोनाल्ड ट्रम्प यांचा युके दौरादेखील त्याच दिवशी प्रस्तावित आहे. अशा परिस्थितीत, पाकिस्तानच्या दाव्यांवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आता पाकच्या दाव्यावर व्हाईट हाऊस काय प्रतिक्रिया देते, हे पाहणे बाकी आहे. कारण अमेरिका किंवा पाकिस्तानी सरकारने याबाबत अधिकृत निवेदन जारी केलेले नाही.
अलीकडेच पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरने अमेरिकेचा दौरा केला होता. या दौऱ्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध मजबूत झाल्याच्या बातम्या सुरू झाल्या. आता तर स्वतः ट्रम्प अमेरिकेचा दौरा करणार असल्याचा बातम्या येत आहेत. जर ट्रम्प सप्टेंबरमध्ये पाकिस्तानला गेले, तर १९ वर्षांनंतर हा एक मोठा पराक्रम होईल. गेल्या दोन दशकांत कोणत्याही अमेरिकन राष्ट्राध्यक्षाने पाकिस्तानचा दौरा केलेला नाही. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी मार्च २००६ मध्ये पाकिस्तानला शेवटची भेट दिली होती.