मुंबई : विधानसभेत जनसुरक्षा विधेयक सादर झाले त्यावेळी काँग्रेसचे विधानसभेतील गटनेते विजय वडेट्टीवार सभागृहात नव्हते. या गैरहजेरीप्रकरणी वडेट्टीवारांना काँग्रेस हायकमांडने कारणे दाखवा नोटीस बजावल्याचे वृत्त आहे. पण मला अद्याप कोणतीही नोटीस मिळालेली नाही, असे वडेट्टीवारांनी विधानभवनाच्या आवारात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींश बोलताना सांगितले.
सभागृहात असतो तर विधेयकाचे कागद तिथेच फाडून टाकले असते असे विजय वडेट्टीवार म्हणाले. शहरी नक्षलवादाच्या नावाखाली सरकार विरोधकांचा आवाज दाबून टाकण्याचा प्रयत्न करत आहे. उद्योगपतींविरोधात ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहेत. ही आंदोलनं दडपण्यासाठीच सरकारने जनसुरक्षा विधेयक सादर केल्याचा आरोप त्यांनी केला.
जनसुरक्षा विधेयकावर १२ हजार आक्षेप आले होते. या संदर्भात विरोधकांनी लेखी स्वरुपात त्यांचे मत मांडले होते. पण सत्ताधाऱ्यांनी बहुमताच्या जोरावर दोन्ही सभागृहात विरोधकांचा आवाज दाबून टाकला, असेही वडेट्टीवार म्हणाले. मी सभागृहात नाही हे बघूनच सरकारने विधेयक सभागृहात आणले आणि मंजूर करुन घेतले, असेही वडेट्टीवार म्हणाले.