ठेकेदाराच्या राजकारणामुळे लाखोंचा निधी परत जाण्याची शक्यता
सफाळे :पालघर जिल्ह्यातील चहाडे-तांदुळवाडी रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. या रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी टेंडर काढून ते काम वाडा येथील एका ठेकेदारांना दिले. मात्र पालघरच्या युनियन ठेकेदाराने हे काम बंद पाडले. त्यामुळे ठेकेदारांच्या राजकारणामुळे रस्ता दुरुस्तीचा लाखोंचा निधी परत जाणार की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.
चहाडे-तांदूळवाडी रस्ता पाऊस पडताच खड्ड्यात गेला असून या खड्डयांत पावसाचे पाणी साचल्याने वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही, परिणामी अपघाताच्या घटना सतत घडत असतात. चहाडे- तांदुळवाडी रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी ३० लाखाचा निधी देण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत मिळाली. या रस्त्यावर खड्डे बुजवण्यासाठी टेंडर सुद्धा काढले होते. हे टेंडर वाड्यातील एका ठेकेदारांना दिले. मात्र पालघरच्या युनियन ठेकेदाराने हे काम बंद पाडले. त्यामुळे हे काम वेळीच पूर्ण झालेच नाही परिणामी रस्त्याची अक्षरशः चाळण होत चालली आहे. तर काम होत नसल्याने हा निधी परत जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या रस्त्यावरून दिवसभरात हजारो प्रवाशी प्रवास करत असतात.
त्या मध्ये गरोदर महिला, वयोवृद्ध , शाळेचे विद्यार्थी तसेंच अनेक कामगार यांच्या जीवाशी हा खेळ सुरु आहे. या रस्त्यावर रोज अपघात होत असतात. कोणाचे प्राण गेल्यावर प्रशासनाला जाग येईल का ? असे लोक दपक्या आवाजात बोलत आहेत. हा रस्त्याचा प्रश्न लवकरात लवकर प्रशासनाने सोडवला नाही तर परिसरातील नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा संतप्त सुरात इशारा दिला आहे.