पुणे : मागील चार ते पाच वर्षांपासून निवडणुकीची वाट पाहणा-या पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती इच्छुकांना प्रशासनाने प्रस्थापितांना मोठा धक्का दिला आहे. खेड तालुक्यासह अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणांत फेरबदल करण्यात आलेत. या गट-गण रचनेचा राजकीय परिणाम काय होईल, याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न जिल्ह्यातील सर्वच पक्षांचे नेते करत आहेत. पुढील एक-दोन दिवसांत हे चित्र स्पष्ट होईल, असे सांगितले जात आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका गेल्या चार-साडेचार वर्षांपासून रखडल्या होत्या. कोरोना महामारी, ओबीसी आरक्षण आणि राज्यातील राजकीय घडामोडींचा थेट परिणाम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर झाला. अखेर सर्वोच्च न्यायालयाने पुढील चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या, असे स्पष्ट आदेश दिल्यानंतर राज्य शासनाने हालचाली सुरू केल्या. त्यानुसार सोमवारी पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी गट-गण रचनेची अधिसूचना जाहीर केली.
२०११ ची जनगणना ग्राह्य धरून ही प्रारूप रचना करण्यात आली आहे. १३ तहसील कार्यालये, याबरोबरच पंचायत समिती कार्यालये आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर ती प्रसिद्ध करण्यात आली. जिल्हा प्रशासनाच्या वतीने ७३ गट आणि १४६ गणांची प्रारूप रचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. यात हवेली, जुन्नर, इंदापूर, खेड तालुक्यातील गट-गणांमध्ये मोठे फेरबदल झाले आहेत. हवेली तालुक्यात २०१७ मध्ये जिल्हा परिषद सदस्यांची संख्या १३ होती, ती आता ६ वर आली आहे.
गट-गण रचनेचे प्रारूप प्रसिद्ध झाल्याने ग्रामीण भागात कोणत्या गटात-गणात कोणते गाव आले आहे, हे स्पष्ट झाल्यामुळे इच्छुकांसाठी मोर्चेबांधणी करणे सोयीचे झाले आहे. मात्र, काही ठिकाणी यावर आक्षेप नोंदविण्यात आले आहेत.
कशी असेल गण गट रचना....
जुन्नर, खेड आणि इंदापूर या तीन तालुक्यांमध्ये जिल्हा परिषदेचे प्रत्येकी ८ सदस्य असतील.
त्यामुळे ७३ पैकी २४ सदस्य या तीन तालुक्यांमध्ये असणार आहेत.
सर्वात कमी म्हणजे २ जिल्हा परिषद सदस्य संख्या ही राजगड (वेल्हे) तालुक्यात असतील.
जिल्ह्यात २०१७ मध्ये जिल्हा परिषद सदस्यांची संख्या ७५ तर पंचायत समितीच्या सदस्यांची संख्या १५० होती.
२०१७ नंतर हवेली आणि मुळशी तालुक्यातील काही गावांचा समावेश महापालिकेच्या हद्दीत करण्यात आला.
उरुळी, देवाची-फुरसुंगी या दोन्ही गावांची मिळून स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्यात आली.
हवेली तालुक्यात २०१७ मध्ये जिल्हा परिषद सदस्यांची संख्या १३ होती. आता या तालुक्यात जिल्हा परिषद सदस्य संख्या ६ वर आली आहे.
जुन्नर, खेड, दौंड, भोर आणि इंदापूर तालुक्यात जिल्हा परिषद सदस्य संख्येत एकने वाढ झाली आहे.