मुंबई : लालबागचा राजा म्हटलं की सर्वच भव्यदिव्य. त्यातच यंदा लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं ५० फुटी उंचीचा भव्य मंडप उभारण्याची घोषणा केलीय. मात्र सामाजिक कार्यकर्ते कमलाकर शेनॉय यांनी सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केलाय. मंडळाने मिळालेल्या परवानग्या जाहीर करण्याची त्यांची मागणी आहे. खरंच या परवानग्या मिळाल्या आहेत का ?
मुंबईचा गणेशोत्सव आणि लालबागचा राजा जगभरात प्रसिद्ध. यंदा लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आपला ९२वा गणेशोत्सव साजरा करतंय. त्यामुळे २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या कालावधीत होणाऱ्या या उत्सवासाठी मंडळानं ५० फुटी भव्य मंडप उभारण्याची योजना आखलीय. हा भव्य मंडप चार मजली इमारतीएवढा उंच असेल आणि संपूर्ण वातानुकूलितही असेल. याशिवाय १० दिवस २४ तास भंडारा आणि ३० लाख लाडूंचं वाटपही होणार आहे.
गेल्या वर्षी लालबाग राजाला १० लाखांहून अधिक गणेशभक्त आणि भाविकांनी भेट दिली होती. यंदाही लाखो भक्त येण्याची शक्यता आहे. मात्र या भव्य मंडप आणि गर्दीमुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय. सामाजिक कार्यकर्ते कमलाकर शेनॉय यांनी मंडळाकडे सर्व परवानग्या जाहीर करण्याची मागणी केलीय. यामध्ये अग्निशमन दल, वाहतूक पोलीस, पर्यावरण विभाग आणि अन्न व औषध प्रशासन यांच्याकडून मिळालेल्या परवानग्यांचा समावेश आहे.
कमलाकर शेनॉय यांनी एक्सपोस्टद्वारे ही मागणी केलीय. ५० फुटी मंडप, वातानुकूलन यंत्रणा, २४ तास भंडारा आणि ३० लाख लाडूंचं वाटप यामुळे वाहतूक, पर्यावरण आणि सुरक्षेवर परिणाम होऊ शकतो. यासाठी मंडळाने सर्व परवानग्या जाहीर कराव्यात आणि भक्तांच्या सुरक्षेची खात्री द्यावी, अशी त्यांची मागणी आहे.
लाखो भक्त लालबागच्या राजाच्या दर्शनाला येणार आहेत. इतक्या मोठ्या मंडपामुळे चेंगराचेंगरीचा धोका निर्माण होऊ शकतो, असं शेनॉय यांचं म्हणणं आहे. यंदा या भव्य मंडप आणि सजावटीसाठी रिलायन्स इंडस्ट्रीजचे अनंत अंबानी प्रायोजक आहेत. मात्र इतक्या मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या या उत्सवामुळे पर्यावरणावर होणारा परिणाम हा चिंतेचा विषय आहे.
प्रकाशयोजना, ध्वनिप्रदूषण आणि गर्दीमुळे पर्यावरण विभागाची परवानगीही तितकीच महत्त्वाची आहे. मुंबई पोलिसांनी गणेशोत्सवासाठी व्यापक सुरक्षा व्यवस्था केलीय. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही हजारो पोलीस कर्मचारी, सीसीटीव्ही कॅमेरे आणि विशेष पथकं तैनात केली जाणार आहेत.
मात्र शेनॉय यांच्या मते, या सर्व परवानग्या आणि सुरक्षा उपाययोजनांची माहिती भक्तांना उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. लालबागचा राजा मंडळाने यंदा भव्यतेचा नवा उच्चांक गाठण्याची तयारी केलीय, मात्र या भव्यतेसोबतच भक्तांच्या सुरक्षेची आणि पर्यावरणाच्या संरक्षणाची जबाबदारीही मंडळावर आहे. त्यामुळे मंडळाने सर्व परवानग्या जाहीर करून आणि पारदर्शकता ठेवून गणेशभक्तांना विश्वास देणंही महत्त्वाचं आहे. सामाजिक कार्यकर्त्याने प्रश्न उपस्थित केलाच आहे, आता लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ काय भूमिका घेतं, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.