नाशिक : नाशिकमध्ये होणार्या कुंभमेळ्याच्या पवित्र वातावरणात राजकीय हालचालींना कमालीचा वेग आलाय. कुंभमेळा आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने स्थानिक नेत्यांना पक्षात सामावून घेण्याचा जोरदार सपाटा लावलाय. त्यामुळे यंदाच्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपची हिंदुत्ववादी भूमिका आणखी ठळक होताना दिसतेय.
कुंभमेळा आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी राजकीय डावपेचांचा खेळ सुरू झालाय. यात भाजपने स्थानिक पातळीवरील नेत्यांना पक्षात स्थान देऊन हिंदुत्वाची भूमिका ठळकपणे मांडण्याचा प्रयत्न सुरू केलाय. गेल्या काही महिन्यांत भाजपने काही माजी काँग्रेस नेते, प्रादेशिक पक्षांचे नेते तसंच सामाजिक कार्यकर्त्यांना पक्षात प्रवेश दिलाय.
या रणनीतीमागे स्थानिक पातळीवर पक्षाची ताकद वाढवण्याचा आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर जनतेचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न आहे. कुंभमेळा हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा उत्सव. येथे लाखो भाविक येतात आणि याच संधीचा फायदा घेऊन भाजप आपली हिंदुत्ववादी विचारधारा मांडण्याचा प्रयत्न करतंय.
स्थानिक नेत्यांना सामावून घेऊन पक्ष आपली सामाजिक आणि राजकीय पकड मजबूत करतंय. याचा फायदा त्यांना निवडणुकांमध्ये होऊ शकतो. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपने हिंदुत्ववादी भूमिकेला धार आणण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतलेत. पक्षाचे नेते साधू-संतांच्या गाठीभेटी घेताहेत. धार्मिक कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. स्थानिक समस्यांवर लक्ष केंद्रित करत आहेत. त्यामुळे पक्षाला धार्मिक आणि सामाजिक पाठिंबा मिळतोय.
भाजपच्या या रणनीतीला विरोधकांनी मात्र राजकीय खेळ असं म्हटलंय. कुंभमेळ्यासारख्या धार्मिक प्रसंगाचा वापर राजकीय फायद्यासाठी करणं चुकीचं आहे, अशी विरोधकांची भूमिका आहे, मात्र भाजपनं या टीकेला भीक घातलेली नाही. उलट हिंदुत्व ही मूलभूत विचारधारा आहे आणि ती पुढे नेण्यासाठी भाजप कटिबद्ध आहे, अशी भाजप नेत्यांची भूमिका आहे. कोणत्याही परिस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शहर आणि गाव पातळीवर एकहाती वर्चस्व प्रस्थापित करायचं हे भाजपचं उद्दिष्ट आहे आणि त्यासाठी भाजपने कंबर कसलीय.
महानगरपालिका ताब्यात आल्यास हुकमी मतपेढी तयार होईल आणि त्याचा आगामी निवडणुकांसाठी फायदा होईल, ही भाजपची रणनीती आहे. तर दुसरीकडे महायुतीचे घटक पक्ष असलेली शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही हालचाली सुरू केल्या आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आक्रमक रणनीती आखायला सुरुवात केलीय.
याचा परिणाम सध्या नाशिक आणि जळगावमध्ये दिसतोय. या दोन्ही पक्षांनी ठाकरे गट आणि पवार गटाला लक्ष केलंय. एकूणच कुंभमेळ्याच्या पवित्र वातावरणात राजकीय रंग चढताना दिसतोय. भाजपची ही रणनीती यशस्वी ठरते की विरोधकांचा विरोध प्रभावी ठरतो, हे येणारा काळच ठरवेल. पण एक गोष्ट नक्की की, हिंदुत्वाचा मुद्दा आणि स्थानिक नेत्यांचा पक्षप्रवेश यामुळे भाजपच वरचढ ठरतोय.