Monday, August 4, 2025

भारताकडे शस्त्रसंधीसाठी पाकिस्तान सैन्यांकडूनच पुढाकार

भारताकडे शस्त्रसंधीसाठी पाकिस्तान सैन्यांकडूनच पुढाकार

पीसीआय अहवालानंतर ट्रम्प यांचा दावा फोल


नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारत आणि पाकिस्तानात चार दिवस सैन्य संघर्ष झाला होता. या संघर्षादरम्यान पाकिस्तानी सैन्याने भारताकडे शस्त्रसंधीचा प्रस्ताव दिला होता, असा दावा भारतातील नव्हे तर पाकिस्तानमधील थिंक टँकने केला आहे. पाकिस्तान-चायना इंस्टिट्यूट (पीसीआय) नावाचा हा अहवाल अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या डोळ्यांत अंजन घालणारा आहे. भारत-पाकमधील शस्त्रसंधी माझ्यामुळे झाल्याचा ट्रम्प यांचा दावाही फोल ठरत आहे.


पीसीआय अहवालानुसार, ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष थांबवण्यासाठी पाकिस्तानच्या लष्करी ऑपरेशन्स महासंचालकांनी (डीजीएमओ) स्वतः भारतीय समकक्षांशी संपर्क साधला होता. अहवालातील या माहितीमुळे डोनाल्ड ट्रम्प यांचा मध्यस्थीचा दावाही फेटाळला गेला आहे. हा अहवाल अमेरिकेच्या प्रतिष्ठेला गंभीर धक्का देणारा आहे. १० मे रोजी पाकिस्तानच्या डीजीएमओने भारतीय समकक्षसोबत थेट संपर्क केला होता. त्यामुळे शस्त्रसंधीची मागणी पाकिस्तानकडून करण्यात आल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.



ट्रम्प यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह


‘दक्षिण अशियाला नवीन आकार देणारे १६ तास’ या शीर्षक खाली हा अहवाल प्रसिद्ध झाला. त्यात ट्रम्प यांच्या मध्यस्थींच्या प्रयत्नांमुळे इंडो-पॅसिफिकमधील अमेरिकेच्या धोरणाचे नुकसान झाले आहे, असे म्हटले आहे. ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानला समान वागणूक दिली आणि काश्मीरवर मध्यस्थी करण्याची ऑफर दिली. यामुळे या भागात चीनच्या भूमिकेला महत्त्व आहे. अमेरिकेला दक्षिण आशियात वर्चस्व मिळवून देण्यात ट्रम्प अपयशी ठरल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे. अमेरिकेने मित्र राष्ट्र भारताला पाठिंबा देण्याऐवजी या मुद्द्यावर मध्यस्थी करण्याची भूमिका घेतला. ट्रम्प यांची घोषणा ही एक राजनैतिक चूक असल्याचे अहवालात म्हटले आहे.



भारताची बाजू जगासमोर


भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानचे झालेल्या नुकसानीमुळे पाकिस्तानने हा निर्णय घेतल्याची शक्यता अहवालात व्यक्त केली आहे. या अहवालामुळे ऑपरेशन सिंदूर दरम्यान तिसऱ्या पक्षाचा सहभाग झाला नाही, ही बाब पुढे आली आहे. थेट पाकिस्तानने संपर्क साधला आणि भारताने आपल्या अटींवर शस्त्रसंधी केली, हा भारताचा दावा अधिक मजबूत झाला आहे.

Comments
Add Comment