Sunday, November 9, 2025

ब्रिटनची ९ मोठी विद्यापीठे भारतात कॅम्पस सुरू करणार; पंतप्रधान मोदी आणि कीर स्टार्मर यांची मोठी घोषणा

ब्रिटनची ९ मोठी विद्यापीठे भारतात कॅम्पस सुरू करणार; पंतप्रधान मोदी आणि कीर स्टार्मर यांची मोठी घोषणा

मुंबई: भारत-ब्रिटन संबंधांमध्ये शिक्षण आणि युवाशक्तीला बळ देणारा एक महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे. ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्या भारत दौऱ्यादरम्यान, गुरुवारी मुंबईतील राजभवन येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या द्विपक्षीय बैठकीनंतर एक महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली.

पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, ब्रिटनची ९ नामांकित विद्यापीठे लवकरच भारतात त्यांचे कॅम्पस सुरू करणार आहेत. या निर्णयामुळे भारतीय विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण घेण्यासाठी परदेशात जाण्याची गरज भासणार नाही, त्यांना देशातच हे शिक्षण उपलब्ध होईल.

या कॅम्पसमुळे दोन्ही देशांमधील शैक्षणिक आणि सांस्कृतिक संबंध अधिक दृढ होतील. तसेच, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) २०२० च्या उद्दिष्टांना बळ मिळेल. यापैकी युनिव्हर्सिटी ऑफ साऊथेम्प्टनने गुरुग्राम येथे विद्यार्थ्यांची पहिली बॅच सुरू केली आहे.

 

विद्यापीठ अनुदान आयोगाने युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क, युनिव्हर्सिटी ऑफ अँबर्डन आणि युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिस्टल यांसारख्या प्रमुख विद्यापीठांना कॅम्पस स्थापन करण्यासाठी इरादापत्रे हस्तांतरित केली.

क्वीन्स युनिव्हर्सिटी ऑफ बेल्फास्ट आणि कोवेंट्री युनिव्हर्सिटी यांना गुजरातमधील गिफ्ट सिटी (GIFT City) येथे कॅम्पस उघडण्यास मंजुरी मिळाली आहे.या कॅम्पसमुळे उच्च शिक्षणाची मागणी पूर्ण होण्यास मदत मिळेल.

Comments
Add Comment