१४ जुलैपासून नोंदणी आणि अर्ज भरणा प्रक्रियेला सुरूवात
मुंबई: महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचा (म्हाडा) विभागीय घटक कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे ठाणे शहर व जिल्हा, वसई (जि. पालघर) येथील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत ५ हजार २८५ सदनिका व ओरोस (जि. सिंधुदुर्ग), कुळगाव-बदलापूर येथील ७७ भूखंड विक्रीकरिता सोडत जाहीर करण्यात आली आहे. सदर सोडतीसाठी अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेचा शुभारंभ 'गो लाइव्ह' कार्यक्रमांतर्गत सोमवार, दिनांक १४ जुलै, २०२५ रोजी दुपारी ०१.०० वाजता 'म्हाडा'चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल (भा. प्र.से.) यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
कोकण मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेली ही सोडत पाच घटकांमध्ये विभागण्यात आली आहे. २० टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत एकूण ५६५ सदनिका, १५ टक्के एकात्मिक शहर गृहनिर्माण योजनेअंतर्गत २००२ सदनिका, म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजना व विखुरलेल्या सदनिका आहे त्या स्थितीमध्ये या योजनेअंतर्गत १६७७सदनिका, म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजनेअंतर्गत (५० टक्के परवडणाऱ्या सदनिका) ४१ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तसेच म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजनेअंतर्गत ७७भूखंड विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
सदर सोडतीसाठी दि.१३ ऑगस्ट, २०२५ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत आहे. दिनांक १४ ऑगस्ट, २०२५ रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्जदार अनामत रकमेचा भरणा ऑनलाईन करू शकतील. सर्व कागदपत्रांची पूर्तता करणारे अर्जदार या प्रणालीद्वारे पात्र ठरविले जातील. सोडतीसाठी स्वीकृत अर्जाची प्रारूप यादी २१ ऑगस्ट, २०२५ रोजी सायंकाळी ६. वाजता 'म्हाडा'च्या https://housing.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे.
कोकण मंडळाच्या संगणकीय सोडतीमध्ये IHLMS २.० संगणकीय प्रणाली व अॅपच्या साहाय्याने अर्ज नोंदणी प्रक्रियेस १४ जुलै, २०२५ रोजी दुपारी ०१.०० वाजेपासून सुरुवात होणार आहे. अर्जदारांच्या सोयीकरिता https://housing.mha-da.gov.in या म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज नोंदणी प्रक्रिया उपलब्ध करून देण्यात आली आहे. अर्जदारांना नवीन संगणकीय प्रणालीची माहिती देणारी मार्गदर्शनपर माहितीपुस्तिका, ध्वनीचित्रफिती, हेल्प फाईल आणि हेल्प साईट या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. सोडत प्रक्रियेत सहभाग घेण्यापूर्वी अर्जदारांनी या मार्गदर्शनपर माहितीचे अवलोकन करावे, असे आवाहन कोकण मंडळाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकर यांनी केले आहे.