खोदकाम करताना पाईपलाईन नादुरुस्त
कल्याण (वार्ताहर) :डोंबिवली एमआयडीसी निवासीमध्ये रहिवाशांच्या घरात गडूळ पाणी येत असल्याने नागरिक संतापले असून त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शुक्रवार दुपारपासून मिलाप नगरमधील वसंत छेडा आणि इतर काही बंगल्यांमध्ये गढूळ, अस्वच्छ, दुर्गंधीयुक्त पाणी बेत असल्याचे दिसल्यावर काहींनी ते समाज माध्यमावर टाकून आपली नाराजी व्यक्त केली, तर काहींनी ही बाब एमआयडीसीला कळविली.
मिलापनगर मधील बहुतेक बंगलोमध्ये त्यांच्या किचनमध्ये एमआयडीसी पाईपलाईनमधून एक जोड्णी थेट घेण्यात आली आहे. त्यामुळे ते पाणी टाकीत न जाता थेट घरात व स्वयंपाकघरात जात असते. तेच पाणी पिण्यासाठी आणि अन्नपदार्थ बनवण्यासाठी वापरत असतात; परंतु हे पाणी गढूळ येत असल्याने नागरिकांपुढे आता आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला झाला आहे.
गढूळ पाणी आल्याने काही रहिवाशांनी पॅकबंद बाटलीतले पाणी विकत आणून आपली गरज भागविली. हे गढूळ पाणी येण्याचे कारण काय असावे याबद्दल काही नागरिकांनी शोध घेतला असता एमआयडीसीमध्ये नवीन नाले गटारांची आणि भूमिगत सांडपाणी वाहिन्यांची कामे जोरात सुरू असून त्यामुळे खोदकाम करताना पाण्याच्या पाईपलाईन या नादुरुस्त होत असल्याने त्यावेळी त्यात बाहेरील पावसाचे आणि उघड्या गटारातील पाणी मिसळले जात असावे. तसेच काही ठिकाणो पाण्याच्या भूमिगत पाईप लाईनला काँक्रीट रस्ते, सांडपाणी वाहिन्या इत्यादी बनविताना धक्के बसून पाईप लाईनला चिरा पडून पाण्याची गळती जमिनीत सुरू असावी, अशा अनेक कारणांमुळे गढूळ, अस्वच्छ पाणी येत असावे अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
एमआयडीसीकडून याबद्दल माहिती मिळाली नसून त्यांच्याकडून ही गंभीर बाब दुर्लक्ष केली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी गरम करून उकळून प्यावे अशी विनंती सर्वांना करण्यात येत असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते राजू नलावडे यांनी दिली.