मिळालेल्या माहितीनुसार, तिरोडा तालुक्यातील सतोना बोपेसर मार्गावर ही घटना घडली. जीवचंद यादोराव बिसेन (वय ४६) हे आज सकाळी आपल्या मुलाला चिराग जीवचंद बिसेन (वय १६) याला शाळेत सोडण्यासाठी दुचाकीवरून (क्रमांक MH 35 AP 9370) निघाले होते. तिरोडाकडे जात असताना, सतोना बोपेसर गावाजवळ रस्त्याच्या कडेला असलेल्या करंजीच्या झाडावर अचानक वीज कोसळली आणि ते झाड थेट रस्त्यावर पडले.
झाड कोसळले त्यावेळी जीवचंद बिसेन यांची दुचाकी नेमकी त्याच्याखालीच होती. काही कळायच्या आतच जीवचंद आणि चिराग यांच्या अंगावर झाड कोसळले. झाडाखाली दबल्याने जीवचंद बिसेन यांचा जागीच मृत्यू झाला. चिराग बिसेन गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील लोकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी चिरागला झाडाखालून बाहेर काढले.
चिरागला तातडीने गोंदिया येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. सकाळपासून तिरोड्यात पावसाने हजेरी लावली होती. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.