मुंबई: अक्कलकुवा तालुक्यातील एका धक्कादायक अंगणवाडी घोटाळ्याचा मुद्दा आज विधानसभेत चांगलाच गाजला. मृत अंगणवाडी मदतनिसाच्या नावाने खोटी कागदपत्रे वापरून दुसऱ्याच महिलेला पगार दिल्याचा आरोप आमदार आमश्या पाडवी यांनी केला. यावरून सत्ताधारी पक्षाचे आमदारच महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्याविरोधात आक्रमक झाल्याचं चित्र दिसलं आणि अखेर मंत्र्यांना संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची घोषणा करावी लागली.
नेमकं काय घडलं?
आमदार आमश्या पाडवी यांनी विधानसभेत प्रश्न विचारला, "अक्कलकुवा तालुक्यात एका अंगणवाडी मदतनिसाचा मृत्यू झाला. पण तिला मृत न दाखवता, चुकीची कागदपत्रे वापरून दुसऱ्याच महिलेला पगार सुरू ठेवला. मृत महिलेच्या मुलाने स्वतः माझ्याकडे तक्रार दिली होती. मी वारंवार तक्रार करूनही कोणतीही कारवाई झालेली नाही."
यावर महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी उत्तर दिलं, "शांता तडवी या अंगणवाडी मदतनिसाचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या जाऊ यांनी खोटी कागदपत्रे देऊन काम करत होत्या. या प्रकरणी कारवाई करून एफआयआर दाखल केला आहे. सुपरवायझरवरही गुन्हा दाखल केला आहे."
सत्ताधारी आमदारांचाच मंत्र्यांविरोधात आक्रमक पवित्रा!
मंत्र्यांच्या या उत्तराने मात्र सभागृहात असंतोष वाढला. भाजपा आमदार सुरेश धस यांनी, "फेब्रुवारी महिन्यात तक्रार केली असताना मे महिन्यात कारवाई केली जाते? याविषयी डेप्युटी सीईओ आणि सीडीपीओ यांनाही निलंबित करा," अशी मागणी केली.
विशेष म्हणजे, या प्रकरणात सत्ताधारी भाजपा आणि शिवसेनेचे आमदारच मंत्री आदिती तटकरे यांच्याविरोधात अधिक आक्रमक झाले होते, तर विरोधक मात्र शांत दिसले. मंत्र्यांच्या उत्तराने समाधान न झाल्याने सत्ताधारी सदस्यांनी आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवला.
अखेर, आमदारांच्या आक्रमक पवित्र्यापुढे झुकत आदिती तटकरे यांनी संबंधित सुपरवायझर आणि सीडीपीओ यांचे निलंबन करण्याची घोषणा केली.
या घटनेने शासकीय यंत्रणेतील ढिसाळ कारभार आणि भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.