CM Fadnavis podcast Maharashtra Dharma: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ

'महाराष्ट्रधर्म' या विशेष पॉडकास्ट मालिकेचे पहिले चरण प्रदर्शित


मुंबई: ‘महाराष्ट्राचा इतिहास गौरवशाली आहे. आणि ती एक जबाबदारी देखील आहे. आपण ज्ञानेश्वरांचे, शिवरायांचे, क्रांतीज्योती सावित्रीबाईंचे आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे थेट वशंज नसलो, तरीही विचारांच्या वारश्याचे वाहक आहोत. या सर्वांनी आपल्या ज्ञानाने, त्यागाने आणि धैर्याने हे राज्य घडविले. त्याला जपणे, वाढवणे आणि पुढे नेणे हे आपले कर्तव्य आहे. महाराष्ट्रधर्म म्हणजे स्मरण रंजन नाही. तो आपला नैतिक मार्गदर्शक. आपण कोण आहोत, हे समजून घेऊन, आपल्याला काय घडवायचे आहे, ते ठरविणे, हाच महाराष्ट्रधर्म आहे,’ अशी मांडणी करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजपासून ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्ट मालिकेचा प्रारंभ केला. ही मुलाखत सुप्रसिद्ध विचारवंत, संत साहित्याचे अभ्यासक, लेखक आणि जगद्गुरू तुकाराम महाराज यांचे वंशज डॉ. सदानंद मोरे यांनी घेतली आहे.



पॉडकास्टच्या माध्यमातून मुख्यमंत्री साधणार जनसंवाद 


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ ते १९ या आपल्या पहिल्या कार्यकाळात ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ हा टि.व्ही. शो केला होता. आता नवमाध्यमात लोकप्रिय अशा पॉडकास्टच्या माध्यमातून ते जनसंवाद साधणार आहेत.



पॉडकस्ट मालिकेचा प्रारंभ ‘महाराष्ट्रधर्म : पायाभरणी आणि उभारणी’ या विषयापासून झाला. आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर सुरू करण्यात आलेल्या 'महाराष्ट्रधर्म' या विशेष पॉडकास्ट मालिकेचे हे पहिले चरण होते. यात रामायणापासून ते महाभारतापर्यंत, जगाला दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग दाखवणार्‍या गौतम बुद्धांपासून ते भक्ती संप्रदायाच्या संतांपर्यंत आणि महाराष्ट्राची अध्यात्मिक पायाभरणी आणि उभारणी या विषयांवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी अभ्यासपूर्ण मांडणी केली. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या समाज माध्यमावरून हे पॉडकास्ट करण्यात येत आहे.


या पहिल्याच पॉडकास्टमध्ये सहभागी झालेल्या श्रोत्यांचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी आभार मानले आहेत. तसेच यापुढेही महाराष्ट्राच्या इतिहासात, संस्कृतीमध्ये, साहित्यामध्ये देवभूमी, संतभूमी, वीरभूमी म्हणून विचार आहे. या सर्वांचा धांडोळा घेतानाच, महाराष्ट्र हा महाराष्ट्र का आहे, याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न राहणार असल्याचेही म्हटले आहे.


आजच्या पहिल्याच पॉडकास्टमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्राची पायाभरणी आणि उभारणीच्या अनुषंगाने मांडणी केली. ‘महाराष्ट्रधर्म हा धर्म नाही. ती आहे, एक जीवंत मुल्य संहिता. ती सांगते विवेकाने विचार करा. सेवाभावाने वागा, आणि शौर्याने उभे राहा. ज्ञानेश्वरांच्या ओव्यापासून शिवरायांच्या तलवारीपर्यंत फुल्यांच्या साहसापासून, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टीकोनापर्यंत ही साखळी कधी तुटलीच नाही. ती सतत पुढे सरकत राहीली,’ अशा मांडणीमुळे पॉडकास्टचा प्रारंभ अभ्यासपूर्ण आणि उत्कंठावर्धक झाला. त्याला मोठा प्रतिसादही लाभला.



महाराष्ट्राची कहाणी सुरु होते देवांच्या पावलांनी…


महाराष्ट्राची कहाणी सुरु होते, ते देवांच्या पावलांनी. रामायणात याचा उल्लेख आहे. राम वनवासात होते. त्यावेळी ज्या दंडकारण्याचा उल्लेख येतो. ते दंडकारण्य विदर्भ ते नाशिक-पंचवटी पर्यंत विस्तारले आहे. महाभारतात सुद्धा महाराष्ट्राची भूमी आहे. विदर्भात दमयंतीची गोष्ट घडली.कोकणातील गुहांमध्ये अर्जून धान्यस्थ बसले होते, असे लोककथांमध्ये सांगितले जाते. महाभारतातल्या रमणीय कथेचा भाग घडतो, तोही विदर्भातच. रुक्मिणीचे कौंडीण्यपूर आणि तिथून तिची भगवान श्रीकृष्णांनी केलेली सूटका, त्यासाठीचे युद्ध देखील या विदर्भाच्याच भूमित घडले. पांडव अज्ञातवासात राहीले, ते चिखलदऱ्यात. किचकाची जुलमी राजवट पांडवानी उधळून लावली. सत्याने असत्यावर मिळवलेल्या विजयाची ही रोमहर्षक कहाणी आहे. महाराष्ट्राची भूमी पुराणांमध्येही आहे. भगवान गौतम बुद्ध हे महाराष्ट्राच्या भूमीत शांततेचा संदेशाच्या रुपाने इथे पोहचले. त्यांचे शब्द संदेश लोकांनी शांतपणे आत्मसात केले. ते शब्द जपले. अजिंठ्याच्या शांत डोंगररांगामध्ये भिक्खुंनी त्यांच्या कथा दगडात कोरल्या. जगाला दुःखातून मुक्त होण्याचा ज्यांनी मार्ग दाखवला त्या भगवान गौतम बुद्धांचे शब्द महाराष्ट्राने फक्त ऐकले नाहीत. त्यांना गुफांमध्ये, स्मृतीमध्ये आणि आत्म्यातही जपले. महाराष्ट्रातील दैवी ऊर्जेमुळे इथे सत्याचा, विश्वाचा शोध घेणारे साधक, संत, विचारवंत इथे आले आणि रमले. शंकराचार्यांनी भारतभर भ्रमण केले. त्यांनी त्यांचे एक महत्वाचे पीठ करवीर पीठाच्या रुपाने स्थापन केले. इथे साक्षात महालक्ष्मीचा निवास आहे. महाराष्ट्र हा उत्तर आणि दक्षिण भारताला जोडणारा दूवा आहे.



पंढरीची वारी चालती-बोलती संस्कृती


इथल्या मातीनेच बोलायला सुरवात केली, ती संतांच्या रुपाने. तेराव्या शतकात चक्रधर स्वामींनी स्थापन केलेला महानुभव पंथ जाती-पातींना नाकारणारा आहे. त्यांनी साध्या-सोप्या भाषेत शिकवण दिली. नंतरच्या काळात नम्रता आणि श्रद्धा यावर आधारलेली वारीची परंपरा आली. जगात क्वचितच अशी यात्रा असेल. जी सामाजिक समतेचा झरा बनली आहे. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी दिली. पसायदान ही जागतिक संस्कृतीतील सर्वोत्तम प्रार्थना आहे. निवृत्तीनाथांनी नाथ संप्रदायाची सुरुवात केली. मुक्ताईंच्या ओव्या तर मंत्रमुग्ध करणाऱ्या आहेत. संत नामदेवांच्या विचारांना गुरू ग्रंथसाहिबमध्येही स्थान आहे. पंजाबमध्ये आपण घुमान येथे साहित्य संमेलन घेतले. पंजाबमध्ये संत नामदेव यांच्याविषयी मोठा आदर, भक्तीभाव पाहायला मिळाला. संत एकनाथ, संत चोखोबा, त्यांच्या पत्नी सोयराबाई असे सर्व संत हे केवळ उपदेशक नव्हते, ते भक्तीचे लोकशाहीकरण करणारे, शस्त्र हाती न घेणारे योद्धे होते. आपली वारीची परंपरा ही चालती-बोलती संस्कृती आहे. एक अखंड स्मृती आहे, जी महाराष्ट्राचे आत्मभिमान जपते आहे. हजारो वर्षांपूर्वी परकीय आक्रमणाला न जुमानता, जिझिया कराचा जाच न बाळगता चालत राहीली. वारी न इस्लामी राजवटीत थांबली, न इंग्रजी आक्रमणात. हजारो दिंड्या या वारीत सहभागी होतात. यंदाही या वारीत देश-विदेशातून लोक सहभागी झाले आहेत. यावर्षी काहींनी या वारीत आर्टिफिशियल इंटेलिजन्सचाही वापर सुरु केला आहे. हा पंढरीचा महिमा थक्क करणारा आहे.



मराठा तलवार यमुनेपर्यंत पोहचली


छत्रपती शिवाजी महाराज हे ध्येयाकरिता लढले. ते सत्तेकरिता लढले नाहीत. ते देव-देश आणि धर्माकरिता लढले. या वीर योद्ध्यांची तलवार धर्माच्या मार्गावरच चालणारी होती. त्यांचे युद्ध हे जिंकण्यासाठी नव्हते. ते चरित्र जपण्यासाठी होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य राजवाड्यातील जड-जवाहिरातून नव्हे, तर आईच्या गोष्टींतून साकारले. राजमाता जिजाऊंच्या स्वप्नांनी त्यांचे मन घडवले. छत्रपती शहाजीराजेची स्वराज्य संकल्पना त्यांनी साकारली. त्यांचा राज्यकारभार नैतिकतेवर आधारलेला होता. सर्व धर्मांबद्दल आदर, मंदिर-मशिद तोडण्यास बंदी, स्त्रियांचा हे सगळे त्याकाळाच्या पुढे होते. जगात असा राजा कुठे झालेला नाही. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज यांनीही कवी, योद्धा आणि विद्वान म्हणून स्वराज्य आणि धर्माचे रक्षण केले. प्रसंगी त्यासाठी बलिदान दिले. त्यानंतर थोरले बाजीराव पेशवे यांनीही असाच पराक्रम गाजवला. त्यांना घोड्यावरून येणारे वादळ म्हटले जायचे. आयुष्यात ते एकही लढाई हरले नाहीत. बाजीराव हे छत्रपतींचे सेनापती नव्हते, ते संस्कृतीचे द्रष्टे शिल्पकार होते. त्यानंतर योद्धे म्हणून महादजी शिंदे यांनी राखेतून मराठी साम्राज्य उभे केले. त्यांनी दिल्ली पुन्हा मराठ्यांच्या हातात दिली. शिंदे, होळकर, भोसले या मराठी माणसांनी संपूर्ण भारताचा कारभार हाती घेतला. ब्रिटीश, अफगाणांशी मुत्सद्दीपणे त्यांनी वाटाघाटी केल्या. मराठी अस्मिता जपली. राजकारणात मुत्सद्देगिरी जपली, त्याचे अधिष्ठान होते, संस्कृतीचा अभिमान. त्यांच्यामुळेच मराठा तलवार यमुनेपर्यंत पोहचली, आणि भारताच्या केंद्रस्थानी मराठा साम्राज्य पुन्हा प्रस्थापित झाले.



धैर्यशाली नारीशक्ती


इथल्या धैर्यशाली स्त्रियांनाही विसरून चालणार नाही. जेव्हा साम्राज्य संकटात होते, त्यावेळी राजाराम महाराजांच्या पत्नी ताराबाईं तलवार घेऊन उभ्या राहिल्या. त्यांनी औरंगजेबाला वर्षानुवर्षे थोपवून धरले. संताजी जाधव-धनाजी घोरपडेंच्या काळात इथे गवतालाही पाते फुटले. पहिल्या सेनापती उमाबाई दाभाडे यांनी नेतृत्व केले. रणनिती आखली. त्याकाळात स्त्रियांना बोलण्याची संधी नसायची, अशा काळात पुण्यश्लोक अहिल्यादेवी या भारतीय संस्कृतीतील नारीशक्तीच्या प्रतिक ठरल्या.



महाराष्ट्र धर्म थांबलाच नाही


महाराष्ट्राने केवळ योद्धे निर्माण केले नाहीत, तर त्यांनी घडवले धर्माचे रक्षक, राष्ट्राच्या संकल्पनेचे उद्गाते आणि नव्या भारताचे शिल्पकार. महाराष्ट्र धर्म कधी थांबलाच नाही. पण तो बदलत गेला. काळानुसार त्यांनी स्वरूप बदलले पण आत्मा कधीच बदलला नाही. महात्मा जोतिबा फुले यांनी जात, पितृसत्ता आणि अंधश्रद्धा यांना थेट आव्हान दिले. धर्माच्या नावाने होणाऱ्या विषमतेला उघडपणे विरोध केला. त्यांच्या पत्नी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री-शिक्षणासाठी सोसलेल्या धैर्याची परिभाषाच घालून दिली. लोकमान्य टिळक यांनी महाराष्ट्राला राजकीय गर्जना दिली. त्यांनी गणेशोत्सव, वृत्तपत्रे या मार्गानी त्यांनी परंपरेलाच प्रतिकारचे हत्यार बनविले. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मिळवणारच ही केवळ घोषणा नव्हती, ती होती एक जनचळवळ. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विरोध, अपमान, भेदभाव यावर बुद्धी आणि अभ्यासाने विजय मिळविला. कोलंबियामधून शिक्षण घेऊन आलेले डॉ. बाबासाहेब भारताच्या संविधानाचे शिल्पकार झाले. महाड सत्याग्रह, शिक्षणाचा आग्रह आणि जात व्यवस्थेच्या निर्मुलनाचा निर्धार हे सगळे संघर्ष नव्हते, तर नव्या भारताचे नैतिक बांधणी. याच मालिकेत पंडिता रमाबाईंनी विधवा महिलांकरिता शिक्षण आणि अधिकारांची चळवळ उभी केली. गोपाळ गणेश आगरकर यांनी रुढी आणि कर्मकांड यांना थेट प्रश्न विचारले. संत गाडगेबाबा सामाजिक स्वच्छता आणि अंतःकरणातील शुद्धतेचे सुंदर नाते जगासमोर आणले. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकरिता वसतीगृह, शाळा उभ्या केल्या. शिक्षणाच्या माध्यमातून समाजाला उभे केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीतेच्या माध्यमातून ग्रामीण भागातल्या महाराष्ट्राला जीवन शिकवले. म्हणूनच महाराष्ट्रधर्म हा धर्म नाही. ती आहे, एक जीवंत मुल्य संहिता. ती सांगते विवेकाने विचार करा.सेवाभावाने वागा, आणि शौर्याने उभे राहा. ज्ञानेश्वरांच्या ओव्यापासून शिवरायांच्या तलवारीपर्यंत फुल्यांच्या साहसापासून, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टीकोनापर्यंत ही साखळी कधी तुटलीच नाही. ती सतत पुढे सरकत राहीली.


रिद्धपूर हे चक्रधर स्वामींच्या गुरूंचे गोविंदप्रभूंचे क्षेत्र. महाराष्ट्र शासनाने येथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन केले आहे. याच रिद्धपूरमध्ये मराठी भाषेतील अनेक ग्रंथ तयार झाले. काही दिवसांपूर्वी या विद्यापीठाने आपले कामकाज देखील सुरु केले आहे, अशी माहितीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

Comments
Add Comment

पुणे महापालिका निवडणुकीत अनपेक्षित निकाल आंदेकर; प्रभाग २३ मध्ये धंगेकरांना धक्का

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक २३ मधून एक वेगळाच राजकीय निकाल समोर आला आहे. नाना पेठ आणि

Pune Andekar Family : सूनेनंतर सासूनेही मारलं मैदान ! पुण्यात लक्ष्मी आंदेकरचा थरारक विजय

पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक २३ मध्ये चुरस पाहायला मिळाली. या निवडणुकीत सूनेनंतर आता

Shrikant Pangarkar : गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी श्रीकांत पांगारकर जालन्यातून विजयी, राजकीय पक्षांच्या दिग्गजांना चारली धूळ

जालना : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निकालांत जालन्यातून एक धक्कादायक आणि चर्चेचा निकाल समोर आला आहे. ज्येष्ठ

Pune Mahapalika Result : पुणे महापालिका निकाल : एकत्र येऊनही काका पुतण्याचं नुकसान, भाजप आघाडीवर

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या निकालात भारतीय जनता पक्षाने स्पष्ट आघाडी घेत शहराच्या राजकारणात आपली ताकद दाखवून

जळगावकर म्हणतायत.. तुमची आमची भाजपा सर्वांची! भाजपचा हा नेता ठरला धुरंधर

जळगाव : जळगाव महापालिका निवडणुकीत भाजपने अभूतपूर्व यश मिळवत शहराच्या राजकारणात शतप्रतिशत विजय मिळवला आहे.

Solapur election result : सोलापुरात काँग्रेसचा सुफडा साफ; खासदार प्रणिती शिंदेंच्या प्रभागात भाजपचा दणदणीत विजय

सोलापूर : सोलापूर महानगरपालिका निवडणूक निकालात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसच्या खासदार प्रणिती