मुंबई: तळेगाव-दाभाडे येथे पिंपरी चिंचवड पोलिसांनी दोन जणांना पिस्तुल व जिवंत काडतुसांसह पकडले. चौकशीनंतर या आरोपींनी लोकप्रतिनिधींना जीवे मारण्याचा कट रचल्याचे समोर आले. याबाबतची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात येईल असे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली.
सदस्य सुनिल शेळके यांनी याबाबत लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती.
राज्यमंत्री कदम म्हणाले, तळेगाव दाभाडे (ता. मावळ, जि. पुणे) एस.टी. स्टॅण्ड परिसरात दोन आरोपींकडून गावठी पिस्तुल व जिवंत काडतुसे बाळगल्याचे आढळल्यामुळे याबाबत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (MCOCA) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या गुन्ह्यातील आरोपींना जामीन मंजूर झाल्यावर तडीपार करण्यात आले आहे. हत्यारे पुरवणाऱ्या व्यक्तीची ओळख पटली आहे. प्रकरणाच्या मूळ सूत्रधारांचा लवकरच शोध घेतला जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.