नाशिक: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतशी महाविकास आघाडीला गळती लागण्याचे सत्र सुरूच आहे. नाशिकमध्ये तर भाजपाने ठाकरे गटाला अक्षरशः सुरुंग लावला आहे. काही दिवसांपूर्वीच सुधाकर बडगुजर आणि माजी मंत्री बबनराव घोलप यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर, आता ठाकरे गटाचे आणखी एक मोठे नाव भाजपच्या गोटात दाखल होणार आहे.
मोठी बातमी अशी की, अवघ्या चार दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरेंनी महानगरप्रमुखपदाची जबाबदारी दिलेले मामा राजवाडे हे आता भाजपाचा झेंडा हाती घेणार आहेत. ठाकरे गटाला हा प्रचंड मोठा धक्का मानला जातोय.
मंत्री आशिष शेलार यांचे उद्धव ठाकरेंना थेट आव्हान मुंबई: "खऱ्या मर्दांसारखे निवडणुकीच्या रिंगणात या, मैदानात उतरण्याआधीच रडणं सोडा!" अशा बोचऱ्या ...
विलास शिंदे यांनी पक्ष सोडल्यानंतर, उद्धव ठाकरेंनी मामा राजवाडे यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना महानगरप्रमुखपद दिलं होतं. मात्र, पदभार स्वीकारल्याच्या दुसऱ्याच दिवशी एका मारहाण प्रकरणात राजवाडे आणि सुनील बागूल यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांच्या कारवाईपासून वाचण्यासाठी ते दोघेही फरार झाले होते.
आता हेच राजवाडे भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांच्यासोबत ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका सीमा ताजणे, कमलेश बोडके, प्रशांत दिवे हे देखील आजच भाजपामध्ये दाखल होणार असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, शरद पवार गटाचे गणेश गीते हे देखील आज भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत.
मुंबईत आज पक्षप्रवेश सोहळा
या पक्षप्रवेशाबाबत भाजपाने कमालीची गुप्तता पाळली होती. वरिष्ठ नेत्यांच्या अनेक बैठका झाल्यानंतर आज (गुरुवार) दुपारी मुंबईतील भाजपा मुख्यालयात पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यामुळे नाशिकमधील ठाकरे गटाला मोठा हादरा बसला असून, आगामी निवडणुकांमध्ये याचा परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे.