शिर्डी : जगभरातील कोट्यवधी साईभक्तांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू असलेल्या शिर्डीच्या साई मंदिरात चोरट्यांचा उच्छाद सुरु असल्याचे गंभीर वास्तव पुन्हा समोर आले आहे. राजस्थानमधील भिवाडी येथून दर्शनासाठी आलेल्या साईभक्त मंजू सचदेव यांच्या बहिणीची दोन लाख रुपयांची रक्कम असलेली पर्स चक्क साई मंदिरात चोरीला गेली असून याबाबत भाविकांनी शिर्डी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
मंजू सचदेव या आपल्या बहिणी किरण सुनिल ग्रोवर आणि पुजारी श्यामसुंदर यांच्यासोबत १९ जून २०२५ रोजी सकाळी ८.४५ वाजता साई दर्शनासाठी मंदिरात दाखल झाल्या. त्यावेळी किरण ग्रोवर यांच्या हाताशी असलेल्या काळ्या पर्समध्ये दोन लाख रुपयांची रोख रक्कम होती. दर्शनानंतर मंदिराच्या चार नंबर गेटजवळील लाडू काउंटरवर गेल्यावर पर्स उघडली असता ती रिकामी आढळली. पर्स नीट पाहिली असता, खालून ती धारदार वस्तू ने कापल्याचे आढळले.
घटनेची तक्रार साई संस्थान ऑफिसमध्ये करण्यात आली असता, सीसीटीव्ही फुटेजमध्ये मंदिरात दर्शन घेत असताना त्यांच्या पाठीमागून पाच ते सहा जण शिरत असल्याचे स्पष्ट दिसून आले. त्यात एक महिला देखील असून, तीच पर्समधून पैसे काढून खिशात टाकत असल्याचे दिसून येते. या प्रकरणी शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.