प्रश्नाच्या उत्तरात अधिक माहिती देताना मंत्री राठोड म्हणाले, नाल्याची नैसर्गिक रुंदी आणि प्रवाह कायम ठेवण्याबाबत तपासून घेऊनच नाल्यावरील उर्वरित संरक्षण भिंतीचे काम करण्यात येईल. याबाबत चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशीही करण्यात येईल. नाला संपूर्ण चंद्रपूर शहरातून जात असल्याने संपूर्ण नाल्याचा नैसर्गिक प्रवाह लक्षात घेऊनच जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव सादर करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. नाल्यावरील संरक्षक भिंतीला जिल्हा नियोजन निधीतून ५ जुलै २०२३ रोजी प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली. नाल्यावरील १२७ मीटर लांबीच्या संरक्षक भिंतीचे काम १५ डिसेंबर २०२४ पूर्ण करण्यात आले, अशी माहितीही मंत्री राठोड यांनी दिली. या प्रश्नाच्या चर्चेमध्ये सदस्य विजय वडेट्टीवार, किशोर जोरगेवार यांनीही सहभाग घेतला.