मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील भाविकांना आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाण्यासाठी एसटी प्रशासनाकडून विशेष व्यवस्था करण्यात आली असून, पंढरपूरसाठी १३० जादा बस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यापैकी ३० जूनपर्यंत ६२ गाडांचे आरक्षण पूर्ण झाले आहे, तर पंढरपूरहून येणाऱ्या ७८ गाड्यांचे आरक्षण पूर्ण झाले आहे, अशी माहिती एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
आषाढी यात्रेनिमित्त पंढरपूरला श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी मुंबईतील नागरिकांना भाविकांना पंढरपूरला जाता यावे, यासाठी मुंबई विभागाच्या पाचही आगारांतून विशेष १३० बसेस पंढरपूरला सोडण्यासाठीचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच येतानादेखील १३० गाड्यांची व्यवस्था असणार आहे.
ग्रुप बुकिंग असेल, तर थेट गावातूनच पंढरपूरला बस सोडण्यात येणार असल्याचेही एसटी विभागाकडून सांगण्यात आले. ६ जुलैला आषाढी एकादशीनिमित्त भाविक पंढरपूरला दर्शनासाठी जातात. एसटी प्रशासनाकडून दरवर्षी जादा बसेसची सोय करण्यात येते. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून जादा बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. राज्यातील भाविकांच्या मागणीनुसार एसटी प्रशासनाकडून आणखी बसेस वाढवण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.