मुंबई : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडने दिलेल्या माहितीनुसार राज्यात स्मार्ट प्रीपेड नाही स्मार्ट पोस्टपेड मीटर आहेत. विधानसभेत वीज मीटर संदर्भात एक तारांकीत प्रश्न आला होता. या प्रश्नाला उत्तर देताना राज्यात विजेचे स्मार्ट प्रीपेड नाही स्मार्ट पोस्टपेड मीटर आहेत. या मीटरच्या मदतीने बिलिंग केले जाते; असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. आतापर्यंत २८ हजार २०२ वाहिन्यांवर स्मार्ट माटर बसविले आहेत. राज्यात आतापर्यंत ४ लाख ७ हजार ५०७ पैकी १ लाख ४० हजार ५६१ रोहित्रांना (ट्रान्सफॉर्मर) स्मार्ट मीटर बसविले आहेत. राज्यातील २ कोटी २४ लाख ८८ हजार ग्राहकांपैकी ३२ लाख २३ हजार ग्राहकांनी स्मार्ट मीटर बसवून घेतली आहेत. ही सर्व स्मार्ट प्रीपेड नाही स्मार्ट पोस्टपेड मीटर आहेत; अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
स्मार्ट पोस्टपेड मीटर रिअल-टाइम डेटा पुरवतात. यामुळे नेमकी किती वीज वापरली याची अचूक आकडेवारी कंपनीला आणि ग्राहकाला मिळते. या आकडेवारीआधारे योग्य ते बिल ग्राहकाला आकारले जाते. चेक, थेट खात्यात ऑनलाईन ट्रान्सफर अथवा युनिफाईड पेमेंट सर्व्हिस अर्थात यूपीआयच्या मदतीने ग्राहक बिलाचा भरणा कंपनीला करू शकतात.