मुंबई : बीडमध्ये खासगी कोचिंग क्लासेसमध्ये 'नीट' ची तयारी करणाऱ्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी वरिष्ठ दर्जाच्या IPS महिला अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली SIT स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
आमदार चेतन तुपे यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नावर चेतन तुपे म्हणाले की, "गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारे कृत्य बीडमध्ये घडले आहे. विजय पवार आणि प्रशांत खाटोकर या दोन नराधमांकडून एका अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषणाचा प्रकार घडला आहे. या प्रकरणातील दोन आरोपींना अटकही करण्यात आली आहे. त्यांच्यावर पॉक्सो अंतर्गत गुन्हादेखील दाखल करण्यात आला आहे. परंतू, एवढ्या गंभीर गुन्ह्यात पॉक्सोसारख्या कायद्यात केवळ तीन दिवसांची पीसीआर का मागितली? या प्रकरणाची सखोल चौकशी करायला हवी. या दोन्ही आरोपींच्या मागे कुणाचा राजकीय वरदहस्त आहे का? त्यांच्यामागे कुणीतरी गब्बर राजकारणी उभे आहेत का?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममधील एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. पहलगाममध्ये महाराष्ट्रातील ७० वर्षीय आजीवर लैंगिक ...
"या प्रकरणातील पीडित मुलीने समोर येऊन तक्रार दाखल केली. परंतू, अजून किती मुलींसोबत ही घटना घडली? या आरोपींनी आणखी किती मुलींसोबत हे कृत्य केले याबद्दलची माहिती पुढे यायला हवी. त्यामुळे याप्रकरणाची सखोल चौकशी करणार का? या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी नेमणार का? आणि त्यात एखाद्या महिला आयपीएस अधिकाऱ्याची नियूक्ती केली जाणार का? तसेच इतरही मुलींना विश्वासात घेऊन त्यांच्यासोबत असे काही घडले का? याच्या तपासासाठी काही विशेष यंत्रणा उभी करणार का?" असा सवाल आमदार चेतन तुपे यांनी केला.
वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी नेमणार
यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "बीडमध्ये घडलेली घटना अतिशय गंभीर आहे. कोचिंग क्लासच्या माध्यमातून मुलींचे लैंगिक शोषण झाल्याची घटना समोर आली असून त्यातील एका मुलीने आणि तिच्या आईने गुन्हा नोंदवल्याने याबद्दलची वस्तूस्थिती बाहेर आली. पॉक्सो कायद्याच्या अंतर्गत तो गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यातील आरोपींना दोनच दिवसांची कोठडी का मागण्यात आली, यासंदर्भात नक्कीच चौकशी केली जाईल. या प्रकरणात राज्यात मोठ्या प्रमाणात रोष असून याची व्याप्ती अधिक असू शकते अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. एक मुलगी हिंमतीने समोर आली. पण आणखी अशा किती मुलींसोबत असा व्यवहार झाला, असा प्रश्नचिन्ह निर्माण होतो. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची व्याप्ती आणि यातील संवेदनशीलता लक्षात घेता वरिष्ठ दर्जाच्या आयपीएस महिला अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी तयार करण्यात येईल," अशी घोषणा त्यांनी केली.
मुलींना योग्य न्याय मिळावा यासाठी प्रयत्न करणार
"एसआयटीच्या माध्यमातून या गुन्ह्याची चौकशी करण्यात येईल. या प्रकरणाची व्याप्ती कुठपर्यंत आहे? यामागे कुणाचा वरदहस्त आहे का? कुणी राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या वेगवेगळे वळण देत आहे का? या सगळ्याची चौकशी करण्यात येईल. तसेच या माध्यमातून आमच्या मुलींना योग्य न्याय मिळावा यादृष्टीने आम्ही प्रयत्न करू. टाईम बाऊंड पद्धतीने एसआयटी याची चौकशी करेल. याप्रकरणाचा पूर्ण छडा लावून अशा नराधमांना आणि त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना कठोर शिक्षा देण्यात येईल," असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वस्त केले.