‘जुन्या ठाणे शहरातील रहिवाशांना तातडीने पाइपलाइनद्वारे घरगुती गॅस जोडणी द्या’

  28

महानगर गॅस अधिकाऱ्यांना खासदार नरेश म्हस्के यांची तंबी


ठाणे  : ठाणे शहरातील नौपाडा, राम मारुती रोड, घंटाळी, भास्कर कॉलनी आणि आजूबाजूच्या परिसरातील अनेक गृहसंकुलांमध्ये अजूनही पाइपलाइनद्वारे घरगुती गॅस जोडणी झालेली नाही. जुने ठाणे अद्याप घरगुती गॅस जोडणी पासून वंचित आहे. आज ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी रहिवासी आणि महानगर गॅस यांची संयुक्त बैठक घेत अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. तसेच या रहिवाशांना तातडीने पाइपलाइनद्वारे घरगुती गॅस जोडणी करावी अशी तंबीच खासदार नरेश म्हस्के यांनी दिली.


जुन्या ठाण्यात घरगुती गॅस जोडणीची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. महानगर गॅस लिमिटेड (एमजीएल) या कंपनीकडे या संदर्भात मागणी करण्यात आली, अर्ज दिले, बैठकाही घेण्यात आल्या, परंतु अद्याप ठोस कार्यवाही झालेली नाही. या भागातील नागरिकांना घरगुती गॅस ऐवजी सिलेंडरवर अवलंबून राहावे लागत आहे. या समस्येला वाचा फोडण्यासाठी आणि नागरिकांच्या मागण्या अधिक प्रभावीपणे मांडण्यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी किरण नाकती, प्रकाश पायरे, बाळा गवस, संजीव कुलकर्णी यांनी पुढाकार घेतला.


महानगर गॅस लिमिटेडच्या अधिकाऱ्यांशी थेट चर्चा करण्यासाठी त्यांनी आज एक विशेष बैठक आयोजित केली. ही बैठक आनंद आश्रम येथे खासदार नरेश म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत महानगर गॅसचे वरिष्ठ अधिकारी, अभियंते आणि विविध गृहसंकुलांचे पदाधिकारी उपस्थित होते. नागरिकांनी आपल्या तक्रारी अत्यंत स्पष्टपणे मांडल्या. काही ठिकाणी गॅस लाईनच पोहोचलेली नाही, तर काही ठिकाणी कनेक्शनसाठी मोठ्या प्रमाणात अडथळे येत आहेत, काही सोसायट्यांमध्ये सर्व प्रक्रिया पूर्ण करून देखील जोडणी झालेली नाही, अशा तक्रारी रहिवाशांनी केल्या.


या बैठकीत शिवसेनेचे किरण नाकती आणि प्रकाश पायरे यांनी अनेक सोसायटी संदर्भात समस्या मांडल्या आणि महानगर गॅस प्रशासनासमोरील अडचणी समजावून सांगितल्या.


महानगर गॅस ही एकमेव सेवा पुरवठादार कंपनी असल्यामुळे नागरिकांना दुसऱ्या कोणत्याही पर्यायाकडे जाता येत नाही. म्हणूनच या कंपनीने जबाबदारीने काम करणे अत्यावश्यक आहे. तुम्ही सरकारी मान्यतेने सेवा देत आहात, पण नागरिकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करणार असाल तर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, अशी तंबीच खासदार नरेश म्हस्के यांनी अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर महानगर गॅस लिमिटेडचे वरिष्ठ अधिकारी प्रशांत कोठेगावकर यांनी तात्काळ गॅस जोडणी पूर्ण करुन कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. यावेळी विलास जोशी, भास्कर पाटील, प्रीतम रजपूत, शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते व स्थानिक नागरिक उपस्थित होते.

Comments
Add Comment

उबाठा गटाचे माजी नगरसेवक रामदास कांबळे यांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश

रामदास कांबळे यांची युवासेना कार्यकारिणी सदस्यपदी नियुक्ती जाहीर ठाणे: मुंबई महानगरपालिकेतील सायन कोळीवाडा

भारत महासत्ता न होण्यासाठी तरुणाईला अंमली पदार्थांच्या आहारी लोटण्याचा परकीय शक्तींचा डाव

आयआरएस समीर वानखेडे यांचे वक्तव्य कल्याण  : ''आपला भारत देश हा महासत्ता होण्याच्या दिशेने अतिशय विश्वासाने आणि

पोलीस अधिकारी संभाजी देशमुख यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपती पोलीस पदक

कल्याण : पोलीस दलात केलेल्या उल्लेखनीय कामगीरीमुळे राज्य गुप्त वार्ता विभागातील पोलीस अधिकारी संभाजी देशमुख

ठाणेकरांनो, पाण्याचा जपून वापरा करा

मंगळवारी ८ तास पाणीपुरवठा बंद डोंबिवली  : केडीएमसीच्या कल्याण (पूर्व) परिसरातील पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेतील

श्रीकृष्णनाथ पांचाळ ठाण्याचे जिल्हाधिकारी

मुंबई : जालन्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ यांची महाराष्ट्र सरकारने बदली केली असून ठाण्याचे

मध्य रेल्वेची ऐन सकाळी ठप्प झालेली वाहतूक सुरळीत, रेल्वे रुळाला तडे गेल्याने नोकरदारांचे झाले हाल

कर्जत: मध्य रेल्वेची लोकल वाहतूक आज सकाळी काही तासांसाठी विस्कळीत झालेली पाहायला मिळाली. पण रेल्वे प्रशासनाच्या