पुण्यनगरीत अवतरला भक्तीचा महासागर ; माउली व तुकोबांच्या पालखीचे भक्तिभावात स्वागत

  45

पुणे : आषाढीची वारी आहे माझे घरी ।
         आणिक न करी । तीर्थव्रत ।।


पावलागणिक होणारा विठुनामाचा गजर, टाळ-मृदंगाचा नाद, ज्ञानोबा-तुकोबा नामाचा जयघोष अन् या नादासवे पुढे सरकणारा वैष्णवांचा महाप्रवाह, अशा भारलेल्या वातावरणात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली व जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पालख्यांनी शुक्रवारी पुण्यनगरीत प्रवेश केला. पुणेकरांनी अत्यंत भक्तिभावात दोन्ही पालख्यांचे स्वागत केले.



तुकोबांची पालखी आकुर्डीहून, तर माउलींची पालखी आळंदीहून सकाळी मार्गस्थ झाली. सकाळच्या न्याहारीमुळे बळ प्राप्त झालेले वारकरी टाळ-मृदंगाच्या गजर, अभंगाचा ताल व पावसाच्या साथसंगतीत झपझप पावले टाकू लागले. पावलागणिक वारकऱ्यांचा उत्साह वाढू लागला. तुकोबांच्या पालखीने दुपारी दापोडीत विसावा घेतला. त्यानंतर पालखी पुन्हा पंढरीच्या मार्गावर आली. तोवर वाकडेवाडीतील मरिआई गेट चौक ते पाटील इस्टेटपर्यंतचा सारा परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेलेला. तुकोबा-माउलींच्या दर्शनाकडे सगळ्यांचेच डोळे लागले होते.


पाटील इस्टेट चौकात तुकोबांच्या पालखी सोहळ्यातील नगारा झडला अन् भाविकांचे डोळे एकवटले. अश्वांचे आगमन होतात भाविकांनी त्यांचे मनोभावे दर्शन घेतले. त्यानंतर बरोबर विविधरंगी फुलांनी सजविलेला तुकोबांचा रथ दृष्टीस पडला. तुकोबांची पालखी येताच दर्शनासाठी भाविकांची झुंबड उडाली. सायंकाळी पाचच्या सुमारास पालखीचे आगमन झाले. महापालिकेच्या वतीने पालखीचे स्वागत करण्यात आले. रथातील तुकोबांची पालखी अन् पादुकांवर माथा टेकवत अनेकांनी धन्यत्वाचा अनुभव घेतला. तर काहींनी डोळे भरून पादुकांचे दर्शन घेतले.


तुकोबांच्या पालखीच्या आगमनानंतर भाविकांच्या नजरा संगमवाडी पुलावर स्थिरावल्या. दिघी, कळस, विश्रांतवाडी, फुलेनगरमार्गे पालखी संगमवाडीच्या दिशेने पुढे पुढे येऊ लागली. पालखी सोहळ्याचा नगारा झडलाच, सर्वांची उत्सुकता ताणली गेली.


अश्वांच्या आगमनाने वातावरणात चैतन्य पसरले. त्यानंतर टाळ-मृदंगाच्या गजरात अन् दिंड्यादिंड्यातून होणा-या हरिनामाच्या गजरासवे माउलींची पालखी अवतरली. माउलींच्या पादुकांवर माथा टेकवण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली. पुणे महापालिकेच्या वतीने पालखीचे स्वागत करण्यात आले.


दोन्ही पालख्यांचा संगम होताच वैष्णवांच्या या सागराला महासागराचे रूप प्राप्त झाले. या पालखी सोहळय़ावर हेलिकॉप्टरलमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. वैष्णवांचा हा महाप्रवाह संचेती चौक, फर्ग्युसन रस्तामार्गे ज्ञानेश्वर पादुका चौक व तुकाराम पादुका चौकात आला. ग्यानबा-तुकारामचा एकच गजर जाहला. अवघी पुण्यनगरी दुमदुमून गेली. पालख्यांच्या दर्शनासाठी पुणेकरांनी रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी केली होती. ठिकठिकाणी पालख्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. माउलींची पालखी रात्री पालखी विठोबा मंदिरात, तर तुकोबांची पालखी निवडुंगा विठोबा मंदिरात मुक्कामासाठी विसावली. दोन दिवसांच्या मुक्कामानंतर दोन्ही पालख्या रविवारी पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होतील.

Comments
Add Comment

Sambhajinagar Illegal Construction: छत्रपती संभाजीनगरमध्ये अवैध बांधकामावर हातोडा; विरोध करणाऱ्यावर होणार कायदेशीर कारवाई

विरोध करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश  संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने दोन दिवसांच्या

OBC reservation : सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय! नवीन प्रभाग रचनेनुसार आणि ओबीसी आरक्षणासह निवडणुका होणार!

२७ टक्के ओबीसी आरक्षणाला आव्हान देणारी याचिका फेटाळली नवी दिल्ली : महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात गेल्या अनेक

शिक्षकाने लॉजमध्ये जाऊन का केली आत्महत्या?

नांदेड : नांदेड जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कंधार तालुक्यातील एका खासगी शिक्षण संस्थेत कार्यरत

महादेवी हत्तिणीला ‘वनतारा’मध्ये पाठवण्याबाबतचा अहवाल

पेटा संस्थेमार्फत सत्यपरिस्थिती नमूद कोल्हापूर : महादेवी या हत्तिणीला कोल्हापूर मधील एका मठातून वनतारा येथे

हुंड्याऐवजी मुलींसाठी फिक्स डिपॉझिट

मराठा समाजाची लग्न आचारसंहिता अहिल्यानगर : पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणानंतर मराठा समाजातील

डॉक्टरांसाठी ‘क्यूआर कोड’ प्रणाली अनिवार्य

बोगस डॉक्टरांना बसणार आळा पुणे : राज्यातील बोगस डॉक्टरांच्या वाढत्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी आता