रत्नागिरी : तब्बल ३७ वर्षांनी आडिवऱ्याच्या महाकाली मंदिरात पुराचे पाणी!

रत्नागिरी : राजापुर तालुक्यात काल रात्रीपासून पावसाचा कहर झाला आहे. श्रीक्षेत्र आडिवरे येथील श्री महाकाली मंदिरात ३७ वर्षांनंतर पुराचे पाणी शिरले आहे. तालुक्यातील भालावली, धाऊलवल्ली, कोतापूर, नवेदर परिसराला पावसाचा तडाखा बसला असून घरांमध्ये पाणी शिरले, तर रस्ते आणि पुलांची दुर्दशा झाली आहे.




तब्बल ३७ वर्षांनी पुराचे पाणी


जिल्ह्यात सक्रिय झालेल्या मान्सूनने चांगलाच जोर धरला आहे. शुक्रवारी सायंकाळपासून तालुक्यात पडलेल्या पावसाने राजापूर शहरासह ग्रामीण भागाला चांगलाच दणका दिला. या मुसळधार पावसामुळे अर्जुना आणि कोदवली नद्यांना पूर आला असून मध्यरात्री या पुराच्या पाण्याने सहा फुटांपर्यंत धडक मारली होती. वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे आडिवरे येथील प्रसिद्ध श्री महाकाली देवी मंदिर परिसरात पाणी शिरले होते. तब्बल ३७ वर्षांनंतर ही पूरपरिस्थिती निर्माण झाली. भालावली, धाऊवल्ली, कशेळी, नवेदर, कोतापूर या भागातील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नुकसान झाले. धाऊलवल्ली भाटलेवाडी येथील वहाळावरील पूल पुराच्या पाण्यात वाहून गेला. राजवाडी वाडा भराडे येथील रस्त्यावर दरड कोसळली. भालवली परिसरात काही घरांमध्ये नदीला आलेल्या पुरांचे पाणी शिरले होते. काही घरांमध्ये सुमारे चार ते पाच फूट पाणी शिरले.



अनेक घरे, मंदिरांचं नुकसान


भालावली गिरवणेवाडी येथे दरड कोसळून गावात जाणारा रस्ता बंद झाला आहे. मोगरे सडेवाडी येथे रस्त्यावर दरड कोसळली आहे. नवेदर येथील दिनेश पांचाळ यांच्या घरात पावसाचे पाणी शिरून नुकसान झाले आहे. भालावली येथे अनेक घरे, मंदिर तसेच सार्वजनिक रस्त्यांचे नुकसान झाले आहे. भालावली येथील मिलिंद आडविरकर यांच्या घरात पुराचे पाणी शिरून त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. वाडा तिवरे येथे मधुकर गावकर यांच्या घरालगत दरड कोसळुन नुकसान झाले आहे. धाऊलवल्ली ग्रामपंचायतीचेही नुकसान झाले आहे. कोतापूर गावात कोतापूर वड ते एकवीरा देवी मंदिर या मार्गावरील नुकत्याच झालेल्या डांबरी रस्त्याची अवस्था या पावसाने अक्षरशः दयनीय झाली आहे.


पावसाच्या जोरदार प्रवाहाने रस्त्याचे डांबर उखडले असून, ठिकठिकाणी खड्डे आणि खाचखळगे निर्माण झाले आहेत. या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे गावकऱ्यांच्या दैनंदिन वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. गावातील कही घरांच्या अंगणात आणि काही घरांमध्येही पाणी शिरले आहे. रिजवान मोनये यांच्या गॅरेजमध्ये पाणी शिरले. त्यामुळे गॅरेजमधील सामानाचे नुकसान झाले आहे. संतोष नवरे, गौरव नवरे, विवेक प्रभुघाटे, अरुण दीक्षित, विनायक प्रभुघाटे आणि वैभव नवरे यांनी गॅरेजमधील सामान बाजूला हलवण्यासाठी मदत केली.


कोतापूर लक्ष्मी केशव मंदिराखालील करप्याच्या आगरातील एक नंबर शाळेपर्यंत जाणारा पूल पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असून, गावकऱ्यांना, शाळेतल्या मुलांना याचा खूप त्रास सहन करावा लागणार आहे. ओंकार प्रभुघाटे यांच्या गारगेश्वर मंदिरासमोरील आगराचा संपूर्ण गडगा पुराच्या पाण्याने वाहून गेला आहे. त्यामुळे शेती आणि परिसरातील जमिनींचेही नुकसान झाले आहे. गंगाराम जाधव यांच्या काजू फॅक्टरीजवळील विहिरीसमोरील कुंपण मोठ्या प्रमाणात कोसळले आहे.


आज सकाळी संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात सर्वाधिक ११९.८७ मि. मी. पावसाची नोंद राजापूर तालुक्यात झाली आहे. काही भागात वीजपुरवठाही खंडित झाला आहे. मुसळधार पावसामुळे प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली असून तहसीलदार विकास गंबरे यांनी गाव व वाडीवस्तीवरील नुकसानीचे तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.


दरम्यान, रत्नागिरी तालुक्यात ७७.५५ मिमी, लांज्यात ५८.६० मिमी, संगमेश्वरमध्ये ५१.९१ मिमी, खेडमध्ये ४८.५७ मिमी, दापोलीत ४७.५७ मिमी, मंडणगडमध्ये ३१.७५ मिमी, चिपळूणमध्ये २५.५६ मिमी, तर गुहागरमध्ये २२.८० मिमी पावसाची नोंद झाली.

Comments
Add Comment

देशातील पहिले ‘मेनोपॉज क्लिनिक’ राज्यात सुरू

मुंबई : महिलांचे आरोग्य केंद्रस्थानी ठेवत राज्यातील सर्व शासकीय रुग्णालये तसेच शहरी भागांमध्ये ‘मेनोपॉज

पुणे महापालिका निवडणुकीत अनपेक्षित निकाल आंदेकर; प्रभाग २३ मध्ये धंगेकरांना धक्का

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक २३ मधून एक वेगळाच राजकीय निकाल समोर आला आहे. नाना पेठ आणि

Pune Andekar Family : सूनेनंतर सासूनेही मारलं मैदान ! पुण्यात लक्ष्मी आंदेकरचा थरारक विजय

पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक २३ मध्ये चुरस पाहायला मिळाली. या निवडणुकीत सूनेनंतर आता

मध्यम कालावधीसाठी ६ कंपन्यांच्या शेअरला मोतीलाल ओसवालकडून गुंतवणूकदारांना खरेदीचा सल्ला

प्रतिनिधी: आज लघुकालीन व मध्यमकालीन परताव्यासाठी मोतीलाल ओसवाल फायनांशियल सर्विसेसने ६ शेअर गुंतवणूकदारांना

फेडरल बँकेच्या निव्वळ नफ्यातील ४.७% वाढीनंतर शेअरमध्ये 'इतकी' तुफान वाढ

मोहित सोमण: फेडरल बँकेचा तिमाही निकाल जाहीर झाला आहे. एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, बँकेच्या

पनवेल महापालिकेसाठी मतमोजणी सुरू

पनवेल : पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ साठी आज मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. निवडणुकीच्या