ठाणे-बोरिवली बोगदा मुल्लाबाग ऐवजी सत्यशंकरच्या भिंतीपर्यंत वाढणार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे एमएमआरडीएला निर्देश


ठाणे  :  मुंबई - ठाणे - बोरिवली बोगदा प्रकल्पामुळे ठाण्यातील मुल्लाबाग येथील इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना होणारा त्रास दूर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ठाणे-बोरिवली दरम्यान बनणारा बोगदा मुल्लाबाग ऐवजी सत्यशंकरच्या भिंतीपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे स्थानिक रहिवाशांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळणार आहे. तसेच त्यांना होणारा धूळ आणि ध्वनी प्रदूषणाचा त्रास कमी करण्यासाठी बंदिस्त केलेल्या कन्व्हेयर बेल्टद्वारे राडारोडा वाहून नेण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.


ठाणे-बोरिवली बोगद्याच्या कामाला ठाण्यातील घोडबंदर येथील पाच इमारतीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांनी विरोध केला होता. या कामामुळे वाढलेला धुळीचा त्रास आणि दररोज ३०० ते ५०० डंपरच्या वाहतुकीमुळे येथील रहिवाशांनी मुल्लाबाग येथील बोगद्याचे काम तत्काळ थांबवण्याची मागणी करत आंदोलन केले होते. रहिवाशांच्या या आंदोलनाची दखल घेत खासदार नरेश म्हस्के यांच्या पुढाकाराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रश्नावर सह्याद्री अतिथीगृहात मंगळवारी विशेष बैठक घेतली.


या बैठकीला ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के, एमएमआरडीए आयुक्त डॉ. वसंजय मुखर्जी, ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव आणि मुल्लाबाग रहिवाशी संघाचे सदस्य आणि गृहसंकुलाच्यावतीने युवासेनेचे नितीन लांडगे, राकेश मोदी, आशुतोष शिरोडकर, गौतम दिघे, पल्लवी शेट्ये, पंकज ताम्हाणे, नितीन सिंग, दीपक पांडे, केतन खेडेकर, भिडे काका, मधुरेश सिंग, विजय जव्हारकर, दिलीप पुजारी, संतोष सावंत, शरद वारसकर,जयवंत धाणे इत्यादी प्रतिनिधी उपस्थित होते.



या बैठकीत प्रामुख्याने मुल्लाबाग रहिवाशी संघांच्या प्रतिनिधींची अडचण समजून घेण्यात आली. त्यानंतर त्यांच्या मागणीनुसार हा बोगदा मुल्लाबाग ऐवजी सत्यशंकरच्या भिंतीपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच या मार्गावर सध्या वाहतूक कोंडी आणि वायू प्रदूषणाचा त्रास कमी करण्यासाठी कन्व्हेयर बेल्टवरून नेण्यात येणारा राडारोडा आच्छादित करून त्यानंतर तो वाहून नेण्याचा निर्णय घेण्यात आला.


या बेल्टवरून वाहून आणला जाणारा राडारोडा नंतर युनिएपेक्स कंपनीच्या आवारात डंपर आणि टिप्परमध्ये भरण्यात येईल आणि त्यानंतर तो घोडबंदर मार्गे वाहून दुसरीकडे नेण्यात येईल असे या बैठकीत निश्चित करण्यात आले आहे. तसे केल्यास स्थानिकांना वाहतूक कोंडीचा तसेच धुळीचा त्रास होणार नाही. तसेच कन्व्हेयर बेल्टवरून टाकलेला राडारोडा आच्छादन टाकून बंदिस्त करण्यात येणार असल्याने तो रस्त्यावर पडून चिखल होणार नाही त्यामुळे ऐन पावसाळ्यात रस्ते चांगले राहतील आणि रहिवाशांची ती अडचण देखील दूर होईल. तसेच हे काम वेळेत होते की नाही ते पाहण्यासाठी एमएमआरडीएच्या वतीने नोडल ऑफिसरची नियुक्ती करण्याचे निर्देशही शिंदे यांनी या बैठकीत दिले.


यासोबतच युनिएपेक्स कंपनीच्या जागेतून डीपी रोड प्रस्तावित असून भविष्यात येथे वाढणाऱ्या लोकवस्तीचा विचार करता ही जागा संपादित करून हा रस्ता देखील लवकरात लवकर करावा, तसेच या प्रकल्पासाठी ठाणे महानगरपालिकेला अधिग्रहित करायची असलेली युनिएपेक्स कंपनीची जागा देखील लवकरात लवकर अधिग्रहित करावी असेही निर्देश देण्यात आले.


उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पुढाकार घेऊन हा प्रश्न सोडवण्याचा निर्णय घेतल्याने मुल्लाबाग रहिवासी संघाने त्यांचे आणि खासदार नरेश म्हस्के यांचे यावेळी जाहीर आभार मानले. तसेच बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार काम चालते अथवा नाही ते पाहण्यासाठी आपण स्वतः मुल्लाबागला भेट देऊन परिस्थिती पहावी अशी विनंती उपमुख्यमंत्री शिंदे यांना केली. त्यानुसार एकदा याठिकाणी येऊन नक्की पाहणी करू असे सांगून शिंदे यांनी या रहिवाशांना आश्वस्त केले.

Comments
Add Comment

मुरबाडमधील शेतकऱ्यांच्या खात्यात बोनस जमा होण्यास सुरुवात

मुरबाड : मुरबाड तालुका शेतकरी सहकारी संघाने सन २०२४-२५ या हंगामासाठी ज्या शेतकऱ्यांची भातविक्रीसाठी ऑनलाईन

कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा भाजपमध्ये प्रवेश

उल्हासनगरात उबाठा सेनेला धक्का उल्हासनगर : उल्हासनगरमधील उबाठा गटाला मोठा राजकीय धक्का बसला असून कल्याण

ठाण्यात महाविकास आघाडीची ‘बिघाडी’?

महाविकास आघाडीच्या नेत्यांची मोट बांधण्यास सुरुवात काँग्रेसच्या ३५ जागा वाटपाच्या मागणीने अधिक तिढा

नवी मुंबईत कचऱ्यापासून निर्मित खताला मानांकित ओळख

राज्य नोंदणीकृत ‘हरित महासिटी कंपोस्ट’ ब्रॅण्ड  नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन

नवी मुंबई महापालिकेसाठी भाजप-शिवसेनेत ‘कांटे की टक्कर’

दोन्ही पक्षांकडे प्रत्येकी ५४ माजी नगरसेवकांचे संख्याबळ नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या

मीरा भाईंदरच्या मच्छीमारांच्या सर्व समस्या सोडवणार, मंत्री नितेश राणेंचे आश्वासन

भाईंदर : मीरा भाईंदर शहरातील उत्तन परिसरातील मच्छीमारांवर होत असलेला अन्याय दूर करून त्यांच्या सर्व समस्या