Saturday, June 14, 2025

पाकिस्तानवर ७६ हजार अब्ज रुपयांच्या कर्जाचा डोंगर !

पाकिस्तानवर ७६ हजार अब्ज रुपयांच्या कर्जाचा डोंगर !

पंतप्रधान शरीफ म्हणतात, भिकेचा कटोरा घेऊन फिरतो...


इस्लामाबाद : पाकिस्तानच्या आर्थिक सर्वेक्षण अहवालानुसार त्या देशावर एकूण सार्वजनिक कर्ज मार्च २०२५अखेर ७६ हजार ००७ अब्ज पाकिस्तानी रुपये (७६ ट्रिलियन) इतके झाले आहे. हे पाकिस्तानच्या इतिहासातील सर्वाधिक कर्जाचे प्रमाण आहे. या कर्जवाढीमुळे पाकिस्तानच्या आर्थिक स्थितीवर मोठे संकट निर्माण झाले आहे. पाकच्या अर्थ सर्वेक्षणात स्पष्ट करण्यात आले आहे की, "अति किंवा चुकीच्या पद्धतीने व्यवस्थापित केलेले कर्ज हे गंभीर अस्थिरता निर्माण करू शकते. त्याचा व्याजदरांवर भार वाढतो आणि दीर्घकालीन आर्थिक स्थैर्य धोक्यात येते."



पाकिस्तानमध्ये ४५ टक्के जनता गरिबीत


जागतिक बँकेच्या ताज्या अहवालानुसार, पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. एकूण लोकसंख्येपैकी ४५ टक्के लोक गरीबरेषेखाली आहेत तर १६.५ टक्के अत्यंत गरीब श्रेणीत आहेत. २०२४-२५मध्ये आणखी १.९ दशलक्ष (१९ लाख) लोक गरिबीच्या कक्षेत आले आहेत.
पाकिस्तान जागतिक निधीचा वापर देशातील जनतेच्या कल्याणासाठी न करता दहशतवादासाठी करत असल्यावरून भारताने आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेकडे आक्षेप नोंदवले आहेत. पाकिस्तानला मिळणाऱ्या मदतीच्या उपयोगाची पारदर्शक चौकशी व्हावी, अशी मागणीही भारताने केली आहे.



कर्जामध्ये चार वर्षांत दुप्पट, तर १० वर्षांत पाचपट वाढ


२०२०-२१ मध्ये सार्वजनिक कर्ज : ३९,८६०अब्ज रुपये होते.
२०१५-१६ मध्ये कर्ज : १७,३८० अब्ज रुपये होते.
२०२५ मध्ये : ७६,०००७ अब्ज रुपये झाले.
या आकड्यांवरून स्पष्ट होते की अवघ्या दहा वर्षांत पाकिस्तानचे सार्वजनिक कर्ज पाचपट झाले आहे, तर शेवटच्या चार
वर्षांत ते जवळपास दुप्पट झाले आहे.



७६ ट्रिलियनपैकी कर्जाची रचना


स्थानिक कर्ज : ५१,५१८अब्ज पाकिस्तानी रुपये
आंतरराष्ट्रीय कर्ज : २४,४८९ अब्ज पाकिस्तानी रुपये
या आकडेवारीनुसार, पाकिस्तानची अर्थव्यवस्था संपूर्णपणे कर्जाच्या भरवशावर चालत आहे. २०२५ च्या पहिल्या नऊ महिन्यांत कर्जवाढ ६.७ टक्के झाली आहे.


पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी एका भाषणात म्हटले होते की, "आज आपण कोणत्याही मैत्रीपूर्ण देशाला फोन केला किंवा भेट दिली, तर ते समजतात की आपण पैसे मागायला आलो आहोत. गेल्या ७५ वर्षांत पाकिस्तान केवळ भीक मागण्यात व्यस्त राहिला आहे आणि आज अगदी लहान अर्थव्यवस्थाही आपल्यापेक्षा पुढे गेल्या आहेत."

Comments
Add Comment