ठाणे-बोरिवली बोगद्याला जोडणारा रस्ता घोडबंदर रोडपर्यंत भूमिगत करा

मुल्लाबाग परिसरातील रहिवाशांच्या लढ्यात डॉ. जितेंद्र आव्हाड सहभागी


ठाणे : विकासाला कधीच कुणी विरोध करीत नाही. पण, विकास करताना अमर्याद वृक्षतोड करून धुळीचे साम्राज्य निर्माण केले जात असेल अन् त्यातून नागरिकांना फुप्फुसाचे आजार जडणार असतील तर करायचे काय? शांततेसाठी घर घेणाऱ्यांच्या नशिबी गाड्यांच्या आवाजाचा कोलाहल येणार असेल तर नागरिकांना मानसिक धक्का बसणारच ना, त्यामुळे ठाणे - बोरिवली बोगद्याला जोडणारा रस्ता घोडबंदर रोडपर्यंत भूमिगत करावा, अशी नागरिकांसह आपली मागणी आहे. त्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांसह एमएमआरडीएशी झगडण्यास तयार आहोत, असे राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा विधिमंडळ गटनेते डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.


राज्य सरकारचा अंत्यत बहुचर्चित प्रकल्प असलेल्या ठाणे-बोरिवली भुयारी मार्गाविरोधात नुकतेच मुल्लाबाग येथील रहिवाशांनी रस्त्यावर उतरत आंदोलन केले होते. ठाणे शहरातून बोरिवली १५ मिनिटांत गाठण्यासाठी एमएमआरडीएकडून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून भुयारी मार्ग तयार केला जात आहे. परंतु भुयारी मार्ग तयार करण्यापूर्वी एमएमआरडीएने या भागातील अनेक वृक्ष तोडले आहेत. या मार्गाच्या कामामुळे धूळ, प्रदूषण, वाहतूक कोंडी वाढली असून त्याचबरोबर जुन्या वृक्षांवर कुऱ्हाड चालविण्यात आल्याचा आरोप रहिवाशांनी केला होता.


धूळ प्रदूषणामुळे नागरिक आजारी पडण्याचे प्रमाण वाढले असल्याचे रहिवाशांनी सांगितले. हा मार्ग मुल्लाबाग येथून रस्त्यावरून नेण्याऐवजी मुल्लाबाग येथून युनी अपेक्सपर्यंत भुयारी मार्ग नेण्यात यावा, अशी मागणी रहिवाशांनी केली होती. मात्र, त्यावर निर्णय न झाल्याने आपल्या लढ्याचे नेतृत्व डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी करावे, अशी विनंती करीत स्थानिक नागरिकांकडून कॉसमॉस लाँज क्लब हाऊसमध्ये एका बैठकीचे आयोजन केले होते.


डॉ. जितेंद्र आव्हाड म्हणाले की, “मानपाडा भागात लगतचा मुल्लाबाग परिसर निसर्गाने नटलेला आहे. एकीकडे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे डोंगर आणि दुसरीकडे अनेक वर्ष जुन्या वृक्षांची हिरवळ यामुळे ठाण्याच्या इतर भागाच्या तुलनेत या भागात वातावरणमध्ये नेहमी गारवा असतो. येथील निसर्गसंपदा पाहून अनेकांनी या भागात गृहखरेदी केली. आता त्यांना मानसिक धक्का बसला आहे.


दररोज येथून पन्नास हजार गाड्या जाणार असतील तर वाढणारे प्रदुषण आणि श्वसनाचे विकार नागरिकांनी का सहन करायचे? मी रस्त्यावर उतरून लढणारा माणूस आहे. आता लोक रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे निकाल पटकन लागणार आहे. तसे पाहता, हा छोटा प्रश्न आहे. पण, तो सोडविण्याची सरकारची मानसिकता हवीय. हा लढा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यापर्यंत नेणार आहे. हा रस्ता घोडबंदर रोडपर्यंत भूमिगत करावा, यासाठी मी आग्रह धरणार आहे.”


दरम्यान, बोगद्याला जोडणारा हा मार्ग मुल्लाबाग येथून रस्त्यावरून नेण्यात येणार असून येथे टोल नाका ही उभारण्यात येणार आहे. त्याचा त्रास येथील गृहसंकुलतील नागरिकांना सहन करावा लागणार आहे. या मार्गाच्या कामामुळे येथून डम्परद्वारे मातीची वाहतूक केली जात असून दररोज शेकडो ट्रक येथून वाहतुक करतात. यामुळे नागरिकांना रस्ता ओलांडणे शक्य होत नाही.


या वाहतुकीमुळे धूळ प्रदूषण, वाहतूक कोंडी वाढली आहे. त्याचबरोबर जुन्या वृक्षांवर कुऱ्हाड चालविण्यात येत आहे. यामुळे येथील हरित पट्टा नष्ट होत आहे. ठाणे-बोरीवली बोगद्याच्या भुयारी मार्गाला विरोध नाही, परंतु हा बोगदा मुल्लाबाग येथे संपणार आहे. त्यामुळे पुढील मार्ग हा भूतल होत आहे. हा मार्ग पूर्णपणे भूमिगत व्हावा अशी मागणी येथील रहिवाशांनी डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्यासमोर मांडली. यावेळी रहिवाशांच्या वतीने उमेश अग्रवाल, नितीन सिंह, पंकज ताम्हाणे, पल्लवी शेठ, मधुरेश सिंह, दिपक पांडे, स्टीव्ह थॉमस, विवेक जव्हारकर, रचना वैद्य आदींनी आपली कैफियत मांडली.

Comments
Add Comment

एसी ऑफिस सोडून मातीच्या गोण्या उचलल्या!

मोखाडा गटविकास अधिकाऱ्यांचे जलसंधारणासाठी श्रमदान मोखाडा : सरकारी योजना केवळ कागदावर किंवा आदेशापुरत्या

तलावपाळीवर नववर्षाचे स्वागत गंगा आरतीने !

३१ डिसेंबरच्या रात्री कार्यक्रम; वाराणसीहून पंडितांना आमंत्रण ठाणे : ठाणे शहर येत्या नवीन वर्षाच्या

ठाण्यात भाजप-शिंदे गटात जागावाटपाच्या वाटाघाटी

भाजपची ५० जागांची मागणी ठाणे : आगामी ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गट आणि भाजप

अंबरनाथमध्ये २०८ बोगस मतदार !

भाजपचा शिवसेनेच्या शिंदे गटावर आरोप, पोलीस चौकशी सुरू अंबरनाथ : अंबरनाथ नगरपरिषदेच्या निवडणुकीदरम्यान खळबळजनक

Mira-Bhayandar Leopard Attack : होणाऱ्या नवरीवर बिबट्याची झडप: चेहऱ्यावर गंभीर जखमा अन्…नेमकं काय घडलं त्या घरात? मीरा भाईंदर हादरलं!

मीरा भाईंदर : पुणे आणि नागपूरनंतर आता मुंबईलगतच्या मीरा भाईंदर शहरात बिबट्याच्या वावराने मोठी खळबळ उडाली आहे.

पुलाच्या कामामुळे कल्याणमध्ये वाहतूक मार्गात २० दिवस बदल , वालधुनी उड्डाणपुलावर काम सुरू

कल्याण : कल्याण पश्चिम आणि कल्याण पूर्वेला जोडणारा वालधुनी उड्डाणपूल दुरुस्तीच्या कामासाठी काही काळ