Friday, June 20, 2025

मांजरीला पकडण्यासाठी बिबट्याची घरावर उडी; घराची भिंत पडली!

मांजरीला पकडण्यासाठी बिबट्याची घरावर उडी; घराची भिंत पडली!

नाशिक : बिबट्याच्या पाठलागाने घाबरून घरावर चढलेल्या मांजरीला पकडण्यासाठी बिबट्याने थेट घरावर उडी घेतली आणि या घटनेत घराची भिंत पडली. ही थरारक घटना देवळाली गावातील रोकडोबावाडी मागील भागात असलेल्या बुवा मळ्यात काल संध्याकाळी घडली.


नाशिक रोड जवळील आर्टिलरी सेंटरच्या कुंपणालगत असलेल्या या भागात गेल्या काही दिवसांपासून एका मोठ्या बिबट्याचा वावर वाढला आहे. त्याने मळ्यातील लोकवस्ती भागातून एक मांजर उचलून नेली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे काल सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास पुन्हा एकदा मांजरीच्या मागे लागला. जीव वाचवण्यासाठी ती मांजर भीमानाथ विश्वनाथ बुवा यांच्या पत्र्याच्या घरावर चढली.



मागे लागलेला बिबट्या थेट घरावर उडी मारून गेला. वजनदार बिबट्याच्या उडीमुळे घराची भिंत कोसळली आणि पत्र्यांचेही मोठे नुकसान झाले. मोठा आवाज झाल्याने परिसरातील निवृत्ती बुवा, कैलास बुवा, गुड्डू बुवा आणि विश्वनाथ बुवा यांनी धाव घेतली. मानवी हालचाल पाहून बिबट्याने पुन्हा जंगलात धूम ठोकली.


बुवा मळा या भागातून मागील वर्षी जवळपास सात ते आठ बिबटे वन विभागाने जेरबंद केले होते. पुन्हा या भागात बिबट्यांचा वावर वाढला आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी, रहिवासी व त्यांचे पशुधन धोक्यात आले आहे. वन विभागाने या भागात पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी गावक-यांनी केली आहे.

Comments
Add Comment