मुलांची यंत्रे करणे केव्हा थांबेल?

मायभाषा : डॉ. वीणा सानेकर


अनेक विचारवंतांनी मांडलेल्या शिक्षण विचाराचा आढावा घेताना गांधीजींच्या विचाराकडे मन पुन्हा पुन्हा थबकते आहे. गांधीजी शिक्षणाच्या बौद्धिक अंगापेक्षा सांस्कृतिक, नैतिक अंगाला महत्त्व देतात. मातृभाषेतील शिक्षण हा त्यांच्या शिक्षण विचाराच्या केंद्रस्थानी आहे. राज्यकर्त्यांच्या भाषेला अधीन झाल्याने आपण परक्या भाषेला शरण गेलो. शिक्षणाबाबत गांधीजींची मते ठाम होती. परकी भाषा मुलांवर लादणे म्हणजे त्यांच्यावर अकारण भार लादणे आणि त्यामुळे त्यांचा स्वाभाविक विकास खुंटवणे.


मुलांच्या स्मरणशक्तीचा विकास आणि सर्जनशक्तीचा विकास होण्याकरिता मातृभाषा महत्त्वाची भूमिका बजावते. शिक्षणाच्या माध्यमाबद्दल गांधीजी म्हणतात, ‘अनेकांकडे मातृभाषेतील शब्दसंपत्ती इतकी तोकडी आहे की इंग्रजी शब्द व वाक्ये यांचा आधार घेतल्याशिवाय आपले भाषण पुरे करता येत नाही. मुलांच्या ठिकाणी असलेल्या आंतरिक गुणांच्या प्रकटीकरणात खरे शिक्षण आहे. त्यांची स्वतंत्र विचारशक्ती मारली जाऊन ती यंत्रवत बनणे गांधीजींना धोक्याचे वाटते.


बालशिक्षणाबाबत गांधीजी म्हणतात, ‘बालकांच्या शिक्षणातले विषय खरे तर सोप्यात सोपे असायला हवेत पण आपण ते अवघड बनवलेले आहेत. ‘किती खरे आहे हे! विषय अवघड नि त्यात ते शिकवण्याची पद्धतदेखील अवघड, असे असल्यावर विद्यार्थी हौसेने शिकतील कसे?


बालशिक्षणाच्या क्षेत्रात आणि मुख्यतः आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी ज्यांनी मूलभूत काम केले आहे अशा ताराबाई मोडक यांची भेट जेव्हा गांधीजींशी झाली तेव्हा त्या भेटीत गांधीजींनी ताराबाईंच्या शिक्षणविषयक प्रयोगांचे कौतुक केले. बालशिक्षणाकरिता भारतीय बैठक तयार करण्याची गरज असल्याचे त्यांनी सुचवले. भारतीय समाजाच्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, परिस्थितीशी मिळतीजुळती शिक्षण व्यवस्था निर्माण करणे आवश्यक आहे. शैक्षणिक साधने अशी हवीत जी कुणालाही परवडू शकतील. ताराबाई मोडक आणि अनुताई वाघ यांनी महाराष्ट्रात बालशिक्षणाची जी पायाभरणी केली, तिने एक वेगळा आदर्श निर्माण केला.


मुलांनी हौसेने शिकावे म्हणून शैक्षणिक साधनांचा उपयोग करणे ही एक कला आहे. ती आत्मसात करण्यासाठी शिक्षकांनी प्रयोगशील असणे गरजेचे आहे. तसेच अभिव्यक्ती करण्यासाठी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य देणे गरजेचे आहे. ताराबाई आणि अनुताई यांनी नैसर्गिक गोष्टींचा उपयोग करून, साधनांची निर्मिती करून अध्यापन करण्याचा वस्तुपाठ शिक्षकांना घालून दिला. गोष्ट रचणे, ती सांगणे, बडबडगीते-शिशुगीते म्हणणे, पाने, फुले, शिंपले या सर्वांसकट स्वतःच्या भाषेत व्यक्त होण्याचे मोल खूप मोठे आहे, हा संस्कार मनावर बिंबवणारा शिक्षण विचार जेव्हा समजेल तेव्हा बालवयात आपल्या भाषेचा बळी देऊन पालक मुलांवर परक्या भाषेचे ओझे लादणार नाहीत.

Comments
Add Comment

kokan: येवा कोकण आपलोच आसा!

खाचखळग्यातून जाणारी वाट कडेकपारी पार करत थेट सह्याद्रीच्या पायथ्याशी जाऊन मिळते, जिथे मातीचा कण न् कण धुरळा होत

वकिली सेवा पुरवणारी ‘रेस्ट द केस’

शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी कधी चढू नये, असं म्हटलं जातं. कारण कोर्ट-खटला यामध्ये खूप वेळ जातो. सर्वांत

खादी ग्रामोद्योगाची सुवर्ण कामगिरी

भारतातील ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देणाऱ्या खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये उत्पादन,

Narendra Modi : सोने खरेदी नंतर; देश प्रथम

भारतीयांना सोन्याचे आकर्षण पूर्वीपासूनच आहे. पण मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या सोन्याच्या खरेदीमुळे देशाचे परकीय

वेदनेचा हुंकार

अंधारल्या दिशांना दु:खाची सल सलीला घायाळ जखमांचे भय भयाला भयावह अनामिक चिंता चिंतेच्या

आईच्या काळजीतून बनला ‘विल्व्ह’ ब्रँड

दी लेडी बॉस : अर्चना सोंडे कोईम्बतूरमधल्या एका आईला आपल्या लहान मुलीच्या त्वचेची काळजी वाटली. तिच्या त्वचेची