संवाद एकाकी फुलाशी

सहजच : शुभांगी मांडे खारकर


त्या फुलाला कुणीतरी विचारलं, एकटा एकटा राहतोस कंटाळा नाही येत? भीती नाही वाटत? त्यावर ते चिमुकले फूल म्हणाले, अरे एकटा कुठे आहे मी? सकाळ झाली की गुंजन करत भवरा येतो की आणि आजूबाजूच्या झाडांची खबरबात मला देतो. दोन घटका त्याचंही मन मोकळं होतं आणि माझंही.


वारा तर सतत माझ्याभोवती रुंजी घालत असतो. कधी झुळूक बनून तर कधी सुसाट. पावसाला तर माझी इतकी काळजी की कितीही जोरात आला तरी माझ्या अंगावर मात्र हळुवार तुषार टाकतो बघ. पुरतात मला तेव्हढे आणि सकाळची कोवळी उन्हाची तिरीप माझी ख्यालीखुशाली विचारून भरकन बाजूला होते. आता सांग कुठे मी एकटा आहे?


आज सकाळी मात्र शाळेत जाताना एका मुलाने पायाने एक दगड इतक्या जोरात उडवला, की माझा तर जीवच घाबरला. लागला नाही मला तो दगड. पण नीट निरखून पाहिलं मी त्या लेकराकडे तेव्हा रडवेला चेहरा झाला होता रे त्याचा. आई रागावली होती की काय कुणास ठाऊक.


परवा तर मजाच झाली बघ. पांढऱ्या पांढऱ्या केसांची एक आजी डुलत डुलत माझ्याजवळ येऊन थांबली आणि खुदकन हसली! मी पण हसलो... काय आठवलं असेल रे तिला? अशी सोबत होते बघ मला, मग मी एकटा कसा?


ते बघ, ते आजोबा येत आहेत ना... अरे समोर बघ ना, वेंधळाच आहेस अगदी. अरे हे जवळ येऊन थांबले आहेत ना, ते आजोबा... रोजच माझ्या जवळ येऊन थांबतात, मग डोळे पुसत पुसत पुढे निघून जातात. मला पण वाईट वाटतं बघ. पण विचारणार कसं? कुणाच्या आठवणीने असे उदास होत असतील रे? पाहिलंस, किsssती वेळ झाला तुझ्याशी गप्पा मारत बसले आहे मी. तू तुझ्या बाटलीमधलं पाणी दिलंस मला आणि फोटो तर सतत काढतच आहेस. कसे आले आहेत ते फोटो?


आता नाही ना मी एकटा वाटत? अरे एकटं कुणी नसतच या जगात. माणसं, झाडं, प्राणी, पक्षी, सूर्य, चंद्र, चांदण्यांनी भरलेलं आभाळ कळलं...!


आणि एक सांगू एकटं असलं तरी चालतं रे पण कुणी एकाकी होऊ नये इतकच...!

Comments
Add Comment

आनंद सोहळा

- परंपरा, द. वि. अत्रे ग्यानबा तुकाराम’ अन् ‘पुंडलिक वरदा हरी विठ्ठल’ हा नामघोष लाखो वारकऱ्यांच्या तोंडून ऐकायचा

आषाढ... परंपरेतला अन् प्रत्यक्षातला

- चिंतन; डॉ. साधना कुलकर्णी आषाढ मनात आशा घेऊनच उजाडतो. व्याकूळ होऊन संपूर्ण सृष्टी पावसाची वाट बघू लागते. इतर

एका गीतातून जन्मलेला चित्रपट

- स्मृतीपटल; अनिल तोरणे कोणा व्यक्तीला केव्हा आणि कोठे कशापासून प्रेरणा मिळेल हे सांगता येणार नाही. सुप्रसिद्ध

‘अबके हम बिछड़े तो शायद…’

- नॉस्टॅल्जिया; श्रीनिवास बेलसरे उर्दूतील शेरोशायरी अनेकदा रोमांसमधील अगदी तरल भावनांच्या सूक्ष्म छटाही सहज

नर्मदातीरावरील तीर्थांचा महिमा

- महाभारतातील मोतीकण; भालचंद्र ठोंबरे भारतातील गंगा, यमुना, सरस्वती, नर्मदा या नद्यांपैकी नर्मदा नदीच्या केवळ

संकोच नव्हे, संवाद हवा!

- आनंदी पालकत्व; डॉ. स्वाती गानू आजही अनेक पालक मुलांशी लैंगिक शिक्षणाबद्दल बोलणे टाळतात. काहींना संकोच वाटतो,