Saturday, June 21, 2025

कांदा विक्रीचे पैसे थकवल्याने शेतकऱ्यांचा संताप

कांदा विक्रीचे पैसे थकवल्याने शेतकऱ्यांचा संताप

देवळा : तालुक्यातील खारीफाटा येथील खासगी कृषी मार्केटमधील एका कांदा खरेदीदार व्यापाऱ्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपये थकवल्याने मंगळवारी (दि. ३ ) शेतकऱ्यांनी बाजार आवारात एकत्र येत असंतोष व्यक्त केला. यादरम्यान शेतकरी व व्यापाऱ्यात बाचाबाची होऊन काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.


गेल्या काही महिन्यांपासून कांदा व्यापाऱ्याने शेतकऱ्यांना कांद्याचे पैसे देण्यास टाळाटाळ केली असून नोव्हेंबर महिन्यात विकलेला उन्हाळ कांदा विक्रीचा पैसा आजतागायत मिळालेला नाही.


दोन दिवसांत देतो, चार दिवसांत देतो अशा तारीख-पे-तारीख आश्वासनांवर वेळ मारून सहा महिने उलटले तरी घामाचे दाम मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा संयम सुटून आज बाजारात
घोषणाबाजी केली.


यावेळी पणन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. त्यावेळी या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना सहाय्यक निबंधक कार्यालयात लेखी तक्रार देण्याचा सल्ला दिला. घामाचे पैसे मिळालेच पाहिजेत, अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडण्यात आला. शेतकऱ्यांनी दोन दिवसांत पैसे न मिळाल्यास बाजार बेमुदत बंद करण्याचा इशारा दिला.


विशेष म्हणजे यापूर्वी म्हणजे मागील महिन्यात याच मागणीसाठी कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांनी असेच आंदोलन करत या विषयाकडे लक्ष वेधले होते; मात्र अद्यापपर्यंत सदर शेतकऱ्यांचे पैसे न मिळाल्याने असंतोषाचा भडका उडून हमरीतुमरीचे प्रकार घडू लागल्याने हा प्रश्न लवकरात लवकर सुटावा अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.

Comments
Add Comment